(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी (कोकजेवठार) येथे रविवारी अचानक दरड कोसळल्याने दोन घरांवर धोक्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे. सुदैवाने दरड कोसळत असताना त्या ठिकाणाहून कोणतेही वाहन जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच महामार्गालगत दरडी कोसळण्याच्या घटना घडू लागल्याने महामार्गाच्या बांधकामाची गुणवत्ता, उतारांचे संरक्षण आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी सैल झाल्या आहेत. निवळी येथील कोकजेवठार परिसरात रहिवासी जयसिंग सुर्वे आणि सुरेश सुर्वे यांच्या घरालगतची दरड अचानक कोसळली. महामार्गासाठी डोंगर कापून रस्ता रुंद करण्यात आल्यानंतर ही घरे थेट उताराच्या कडेला आली असून, आता त्यांच्यावरील धोका अधिकच वाढला आहे. स्थानिकांच्या मते, उतारांना पुरेशी संरक्षणभिंत, जलनिस्सारण व्यवस्था आणि आवश्यक स्थिरीकरणाची कामे वेळेत झाली असती, तर अशी परिस्थिती उद्भवली नसती.
दरडीची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदार राजाराम म्हात्रे, महामार्ग विभागाचे अधिकारी कुलकर्णी, पोलीस पाटील, सरपंच तसेच ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. संभाव्य धोका लक्षात घेऊन महामार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली. दरडीखाली आलेली माती व दगड हटविण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. दरम्यान, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच संवेदनशील ठिकाणांची पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अपेक्षित असताना संबंधित यंत्रणांनी पुरेशी खबरदारी घेतली का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वारंवार दरडी कोसळणे, रस्ते खचणे आणि अपघातांना निमंत्रण देणाऱ्या घटना घडत असल्याने महामार्ग प्राधिकरण आणि काम करणाऱ्या ठेकेदारांच्या नियोजन व देखरेखीवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सुदैवाने यावेळी जीवितहानी टळली; मात्र प्रत्येक वेळी नशिबाची साथ मिळेलच, याची खात्री नाही. त्यामुळे केवळ दरड हटविण्यावर न थांबता संपूर्ण परिसरातील उतारांचे तांत्रिक परीक्षण करून कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतर जागे होणाऱ्या यंत्रणांची जबाबदारी निश्चित करण्याची वेळ येईल, अशी तीव्र भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

