(संगमेश्वर / एजाज पटेल)
गेल्या काही दिवसापासून कडाक्याची थंडी पडत असल्याने अल्लाहदायक असे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीच्या प्रतीक्षेत असतात. चांगली थंडी पडली तरच आंबा, काजूला चांगली पालवी आणि मोहोर येतो; मात्र यावर्षी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत थंडीने हुलकावणी दिली. एक-दोन दिवस हलकी थंडी झाली. मात्र, त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात हलकी थंडी सुरू होती. परंतु, मागील दोन-तीन दिवसांपासून उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यभरात थंडीचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून गारठा वाढला आहे.
सध्या आंबा, कडधान्याला पोषक असे वातावरण निर्माण झाले असून आंबा उत्पादक चांगलेच सुखावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र धुके पडत आहे. या दाट धुक्यामुळे परिसरात धुक्याची चादर पसरल्याने वाटाही धुक्यात हरवल्या आहेत, तर धुके इतके दाट आहे की त्याचा जनजीवनावरही चांगलाच परिणाम झालेला दिसून येत आहे. वाढत्या थंडीच्या गारठ्यामुळे जनता सर्दी, खोकला सारख्या साथीच्या आजाराने अनेक लोक कमालीचे हैराण झाल्याचे दिसत आहे. काही प्रमाणात खोकला, सर्दीचे रुग्ण आढळून येत असून उपचारासाठी सरकारी तसेच खासगी दवाखान्याकडे रुग्ण उपचार घेत आहेत. तर काही रुग्ण घरच्या घरी उपचार घेत आहेत.
यावर्षी दिवाळी सणामध्ये थंडीचा अजिबात लवलेश जाणवला नाही. परंतु उशीरापर्यंत थांबलेल्या परतीच्या पावसामूळे गेल्या नोव्हेंबरच्या मध्यापासून अधूनमधून आणि डिसेंबर मध्ये देखील अधूनमधून मोठ्या प्रमाणात थंडीची जाणवत आहे. गत काही दिवसापासून एकदम थंडीने जोर धरला व बोचऱ्या थंडीबरोबर दाट धुकेही पडण्यास प्रारंभ झाला आहे. दाट धुक्याच्या जोडीला जाणवणारी बोचरी थंडी यामुळे ग्रामीण भागात दिवसभर उबदार कपडे घालूनच वावरावे लागत आहे. तर लहान बालके, वयोवृद्ध मंडळी, आजारी असणाऱ्यांना मात्र या वातावरणाचा चांगलाच परिणाम जाणवू लागला आहे.
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करताना पडणाऱ्या धुक्याशी सामना करून प्रवास करावा लागत आहे, त्याचा फटका अचानक समोरुन येणारे वाहन धुक्यामुळे दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. त्यात या मार्गावरून चौपदरीकरण रस्त्याचे काम सुरु असल्याने रस्त्याचे पुरते बारा वाजले असल्यामुळे धुक्यात हरवलेल्या वाटेने प्रवास करणे आणखीनच धोकादायक वाटू लागले आहे. धुक्याबरोबरच थंडीचा सामना करीत वाटेवरील वळणांना मागे टाकत प्रवास करणाऱ्या तरुणांना मात्र गुलाबी थंडीच्या आनंदाने चांगलीच हुडहुडी भरत आहे.
सध्या या थंडीच्या काळात मुलांसह ज्येष्ठांचीही भूक वाढते. त्यामुळे नियमित आहाराबरोबरच अन्य खाद्यपदार्थ अतिरिक्त खाल्ले जातात. वातावरण चांगले असल्यामुळे विविध पदार्थांवर ताव मारला जातो. खाताना कुठल्या पदार्थात किती फॅट्स आणि कॅलरीज आहेत, याचा फारसा विचार केला जात नाही. त्यामुळे हिवाळ्यात वजन वाढण्याची भीती असते आणि भविष्यात व्याधींना सामोरे जावे लागू शकते, अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.