(दापोली)
दापोली-मंडणगड मार्गावरील करंजाणी येथे रविवारी (२८ जून) सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास गॅस सिलेंडरने भरलेल्या पिकअप वाहनाचा अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअप अनियंत्रित होऊन रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात वाहनातील सर्व गॅस सिलेंडर रस्त्यावर विखुरल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सिलेंडर रस्त्यावर पडल्यामुळे वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकासह अन्य कोणालाही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. रस्त्यावर विखुरलेले सिलेंडर सुरक्षितपणे बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी त्यांनी प्रशासनाला सहकार्य केले.
गॅस सिलेंडरने भरलेल्या वाहनाचा अपघात झाल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र, कोणतीही गळती किंवा स्फोट न झाल्याने मोठा अनर्थ टळला असून नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

