(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी येथील उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले, तरी त्यासोबत निर्माण झालेल्या वाहतूक समस्यांमुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूंना सध्या सुरू असलेल्या सेवा मार्गिका अत्यंत अरुंद असल्याने दिवसातून अनेक वेळा वाहतूक कोंडी होत असून, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
स्थानिकांच्या मते, उड्डाण पुलाची रचना पिलरवर उभारून खालील मूळ रस्ता आणि बाजारपेठ पूर्ववत ठेवण्याचा पर्याय स्वीकारला असता, तर निवळी बाजारपेठेचे आर्थिक अस्तित्व अबाधित राहिले असते. मात्र, सुरुवातीपासूनच नागरिकांनी या पुलाला विरोध केला होता तर काहींनी पुलाचे समर्थन केले होते. यातून प्रशासनाने मध्यम मार्ग काढून पिलरचा पूल तयार करण्याचा निर्णय घेणे आवश्यक होते. परंतु तसे न झाल्याने त्याची मोठी किंमत स्थानिकांसह वाहनचालकांना मोजावी लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी पर्यायी मार्गांवरील अपुऱ्या रुंदीमुळे अवजड वाहने, एसटी बस आणि खासगी वाहनांची एकाच वेळी मोठी गर्दी होत आहे. परिणामी, काही मिनिटांचा प्रवास करण्यासाठी वाहनचालकांना दीर्घकाळ वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे. एखादी मोठी गाडी थांबली तर वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याचे चित्र आहे.
व्यापारी आणि स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, उड्डाण पुलाचे काम विकासाच्या दृष्टीने आवश्यक असले तरी त्याचे नियोजन करताना स्थानिकांची उपजीविका, बाजारपेठेचे अस्तित्व आणि वाहतुकीचा दीर्घकालीन आराखडा यांचा पुरेसा विचार झाला नाही. त्यामुळे विकासकामाचा लाभ मिळण्याऐवजी नागरिकांना रोजच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमध्ये केवळ काम पूर्ण करण्यावर भर न देता, स्थानिक परिस्थिती आणि नागरिकांच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पुलाचे काम पूर्णत्वाकडे जात असताना वाहतूक व्यवस्थापनात तातडीने सुधारणा करून सेवा मार्ग रुंद करणे, वाहतूक नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करणे आणि स्थानिकांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
भुयारी मार्ग ठरणार जीवघेणा?
निवळी येथील उड्डाण पुलासोबत उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाच्या सुरक्षिततेबाबतही स्थानिक नागरिकांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. भुयारी मार्गाची रचना आणि दृश्यता (व्हिजिबिलिटी) अपुरी असल्याने हा मार्ग भविष्यात अपघातांना निमंत्रण देणारा ठरू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. भुयारी मार्गात एखादे वाहन प्रवेश करत असताना समोरून दुसरे वाहन येत आहे की नाही, याचा स्पष्ट अंदाज चालकांना येत नाही. यामुळे दोन वाहने समोरासमोर आल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय, भुयारी मार्गातून बाहेर पडणारे वाहन थेट मुख्य रस्त्यावर येत असल्याने मोठा धोका निर्माण होत आहे. मुख्य मार्गावरील वेगवान वाहतूक आणि भुयारी मार्गातून अचानक बाहेर येणारी वाहने यामुळे गंभीर अपघात घडण्याची शक्यता वाढली आहे.

