(राजापूर / तुषार पाचलकर)
पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची ‘शिक्षणवाट’ आज वटवृक्षाप्रमाणे विस्तारत असून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा पुढे नेण्याच्या उद्देशाने यंदा जिल्हास्तरीय वक्तृत्व, निबंध आणि कथाकथन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पाचल परिसरातील हुशार, अभ्यासू आणि गुणी विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ मिळावे या हेतूने संस्थेच्या संस्थापक विभूतींच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा भव्य उपक्रम २३ आणि २४ डिसेंबर २०२५ रोजी सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पाचल येथे पार पडणार आहे.
या दोन दिवसीय सांस्कृतिक–शैक्षणिक सोहळ्याची सुरुवात २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कै. गो.बा. (आबा) नारकर स्मृती वक्तृत्व स्पर्धेने होईल. इयत्ता ५ वी ते ७ वीतील स्पर्धकांना ‘एक आई माझा गुरु – आई कल्पतरू’, ‘माझे गाव–माझी जबाबदारी’ आणि ‘रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज’ हे विषय देण्यात आले आहेत. ८ वी ते १० वी गटासाठी ‘आई माझे विद्यापीठ’, ‘मी पूरग्रस्त शेतकरी’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, तर ११ वी ते १५ वी गटासाठी ‘मी स्वातंत्र्यसैनिक बोलतोय’, ‘संत गाडगेबाबांचे प्रबोधन’ आणि ‘कोकण निर्मनुष्य होतंय’ असे विषय देण्यात आले असून सर्व गटांमध्ये रोख रक्कम आणि चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
याच दिवशी कै. पुंडलिक (अण्णा) वायकुळ स्मृती निबंध स्पर्धाही सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पार पडेल. पहिल्या गटासाठी ‘आवडता समाजसुधारक’, ‘माझी शाळा’ आणि ‘प्लास्टिक मुक्त भारत’, दुसऱ्या गटासाठी ‘मोबाईलचे फायदे–तोटे’, ‘राष्ट्रीय एकात्मता’ आणि ‘वाचाल तर वाचाल’, तर वरिष्ठ गटासाठी ‘सोशल मीडियाचा प्रभाव’, ‘आवडता साहित्यिक’ आणि ‘व्यसनाधीन तरुणाई’ हे विषय निश्चित करण्यात आले आहेत. शब्दमर्यादेनुसार १५०, २०० आणि २५० शब्दांमध्ये निबंध लिहायचा असून विजेत्यांना रोख पारितोषिके आणि चषक देण्यात येणार आहेत.
२४ डिसेंबर रोजी कै. चं.बा. साखळकर स्मृती कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कनिष्ठ गटासाठी प्रेरणादायी व बोधकथा, मध्यम गटासाठी काल्पनिक रहस्यमय साहसकथा आणि वरिष्ठ गटासाठी भावनिक ग्रामीण–सामाजिक कथा हे विषय जाहीर करण्यात आले असून या स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे.
स्पर्धांचे वेळापत्रक, विषय, नियम आणि परीक्षकांच्या सूचना यानुसार प्रत्येक स्पर्धकाने ३० मिनिटे आधी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. सर्व स्पर्धा तीन गटांत विभागल्या असून मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांनी प्रमाणित केलेले ओळखपत्र किंवा शिफारसपत्र आवश्यक असेल. नावनोंदणीची अंतिम तारीख १५ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक स्पर्धकाला कोड नंबर देण्यात येईल आणि त्यानुसार पुकारा होणार आहे. दूरवरून येणाऱ्या मुलांसाठी भोजनाची, तर सर्वांसाठी चहा–नाश्त्याची सोय आयोजकांनी केली असून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धांचा निकाल आणि बक्षीस वितरण सोहळा २४ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडेल. आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार आयोजक व परीक्षकांकडे राहतील.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मा. राजेश कृ. सावंत, कार्याध्यक्ष मा. अशोक गं. सक्रे, सचिव मा. रामचंद्र सी. वरेकर, खजिनदार मा. राजन वी. लब्दे आणि स्पर्धा प्रमुख मा. किशोर श्री. नारकर यांच्यासह संपूर्ण कार्यकारी मंडळ परिश्रम घेत आहे. मुख्याध्यापिका मा. सौ. आशा ल. गुरखे आणि विनायक सक्रे (अध्यक्ष–शिक्षक पालक संघ) यांनी समन्वयाची जबाबदारी स्वीकारली आहे. नावनोंदणी किंवा इतर माहितीसाठी सिद्धार्थ जाधव, निलेश राज्याध्यक्ष, जयवंत नायकवडे, विकास पाटील (महाविद्यालय) आणि धनाजी भोसले (तांत्रिक) हे संपर्क व्यक्ती म्हणून नियुक्त आहेत.

