(राजापूर/ प्रतिनिधी)
तालुक्यातील काजिर्डा-राणेवाडी येथे सामाईक घरच्या बांधकामाच्या वादातून दोन कुटुंबांतील जुना संघर्ष पुन्हा उफाळून आला असून, बांधकामस्थळी गोंधळ, शिवीगाळ, दगडफेक आणि धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सौ. प्रिया परशुराम सावंत (वय ३२, सध्या रा. ठाणे पूर्व, मूळ रा. काजिर्डा-राणेवाडी, राजापूर) यांनी राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ मे रोजी दुपारी सुमारास सामाईक घराच्या पायऱ्यांचे बांधकाम सुरू असताना फिर्यादीच्या चुलत जाऊ पल्लवी मनीष सावंत हिने तिचे वडील, भाऊ आणि इतर नातेवाईकांना सोबत घेत घटनास्थळी प्रवेश केला. हातात काठ्या घेऊन आलेल्या या मंडळींनी “माझा हिस्सा मिळाल्याशिवाय काम करू देणार नाही,” अशी भूमिका घेत कामगारांना धमकावत बांधकाम बंद पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या वेळी फिर्यादी प्रिया सावंत यांना अश्लील शिवीगाळ करण्यात आली. दरम्यान, रागाच्या भरात पल्लवी सावंत हिने फिर्यादीच्या सासू अनुसया सावंत यांच्या दिशेने दगड फेकून मारल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सुदैवाने हा दगड त्यांना लागला नाही. घटनेनंतर सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास घराचे कॉन्ट्रॅक्टर धनाजी रघुनाथ पवार हे समजूत काढण्यासाठी घटनास्थळी आले असता, त्यांनाही वादाचा सामना करावा लागला. पल्लवी सावंत हिने कॉन्ट्रॅक्टर आणि फिर्यादीला पुन्हा शिवीगाळ करत त्यांच्या दुचाकीची चावी जबरदस्तीने काढून घेतली आणि गाडी खाली ढकलून दिल्याचा आरोप आहे. तसेच उपस्थित इतर आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवत फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी राजापूर पोलिसांनी पल्लवी मनीष सावंत, कृष्णा बाबाजी आर्डे, चंद्रकांत बाबाजी आर्डे, रमेश चंद्रकांत आर्डे, मनिषा मोतीराम सावंत आणि अमोल मोतीराम सावंत (सर्व रा. काजिर्डा-राणेवाडी, राजापूर) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.

