(रत्नागिरी / वार्ताहर)
गेल्या तीन-चार दिवसांपासून रत्नागिरी शहर आणि धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार मान्सून पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात नव्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली आहे. धरणातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत असली, तरी या नव्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात गाळयुक्त व गढूळ पाणी मुख्य जलसाठ्यात मिसळत असल्याने पाणी शुद्धीकरणाचे मोठे आव्हान रत्नागिरी नगर परिषदेपुढे उभे ठाकले आहे.
धरण क्षेत्रातून थेट जलशुद्धीकरण केंद्रात येणाऱ्या गाळमिश्रित पाण्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ नये, यासाठी नगर परिषदेची यंत्रणा हायअलर्टवर ठेवण्यात आली आहे. पालिकेची दोन्ही जलशुद्धीकरण केंद्रे सध्या पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत.
गढूळ पाण्यामुळे शुद्धीकरण प्रक्रियेवर अतिरिक्त ताण येत असल्याने फिल्टर बेडची २४ तास नियमित स्वच्छता (बॅकवॉश) करण्यात येत आहे. तसेच आवश्यक त्या प्रमाणात क्लोरिनेशन करूनच पाणी वितरण करण्यात येत असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, नव्या पाण्याच्या प्रचंड आवकीमुळे जलस्रोत गढूळ झाल्याने नागरिकांनीही आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरगुती वापराच्या पाण्यात तुरटीचा वापर करावा तसेच पिण्याचे पाणी अनिवार्यपणे उकळून आणि गाळूनच वापरावे, असे आवाहन रत्नागिरी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.
मान्सून काळात पाण्याच्या गुणवत्तेत होणारे बदल लक्षात घेता नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी आणि नगर परिषदेने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

