(राजापूर / तुषार पाचलकर)
श्री आप्पा साळवी मित्रमंडळ आणि निर्मल ग्रामपंचायत तळवडे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता प्रभावती हॉल, तळवडे येथे पाचल व परिसरातील होतकरू विद्यार्थ्यांच्या यशाचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच पितांबरी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रवींद्र प्रभुदेसाई आणि युवा राज्य कार्यकारिणी सदस्य अपूर्वाताई सामंत या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय राजापूर पंचायत समितीच्या सभापती सौ. नंदिनी कदम, उपसभापती अभिजित गुरव, जिल्हा परिषद सदस्य सिद्धाली मोरे व प्रतीक मटकर, पंचायत समिती सदस्य सौ. अपेक्षा मासये, उमेश पराडकर, सौ. समीक्षा वाफेलकर तसेच पाचलचे सरपंच बाबालाल फरास यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
पाचल व परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा सन्मान करण्याबरोबरच त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या गुणगौरव सोहळ्यास परिसरातील पालक, नागरिक, विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा व आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

