(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे आरोग्य सेवा अधिक सक्षम व रुग्णांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अनेक सामाजिक संस्था तसेच ग्रामस्थांच्या वतीने देणगी स्वरूपात मदत करण्यात आली. या मदतीत आवश्यक वैद्यकीय साहित्य, रुग्णोपयोगी साधनसामग्री, औषधे तसेच काही सुविधा पुरविण्यात आल्या. ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपापल्या परीने वैद्यकीय साहित्य स्वरूपात हातभार लावला.
आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पणकुटे, डॉ सुनीता पवार व आरोग्य सहाय्यक डॉ परशुराम निवेंडकर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी या सहकार्याबद्दल सर्व संस्थांचे व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले. या देणगीस्वारुपात वस्तू मिळविण्यासाठी आरोग्य सहाय्यक डॉ. परशुराम निवेंडकर यांनी विशेष प्रयत्न केले. या सहकार्यामुळे रुग्णांना अधिक चांगली व तत्पर आरोग्य सेवा देणे शक्य होणार आहे असे ते म्हणाले.
“ग्रामस्थांचा सहभाग आणि विविध संस्थांचे सहकार्य हेच आरोग्य सेवेला बळ देणारे आहे,” असे यावेळी उपस्थितांनी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ महेश्वरी सातव यांचे मार्गदर्शना खाली आरोग्य केंद्रातील सेवा रुग्णांसाठी अधिक बळकट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचारी यांनी सांगितले.

