(रत्नागिरी / वार्ताहर)
जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असताना नवीन विंधन विहिरी उभारण्यापेक्षा सध्या अस्तित्वात असलेले हजारो हातपंप व विद्युत पंप (बोअरवेल) कार्यरत ठेवण्यावर भर द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. खाजगी ठेकेदारांना दिला जाणारा अवाढव्य देखभाल खर्च तात्काळ बंद करून ही जबाबदारी पुन्हा जिल्हा परिषदेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे सोपवावी, अशी आग्रही भूमिका मनसेने घेतली आहे. यासंदर्भात मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री. रुपेश जाधव यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण रत्नागिरी जिल्हा तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात असताना हजारो हातपंप आणि विद्युत पंप नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यांच्या देखभालीसाठी खाजगी ठेकेदारांना मोठ्या प्रमाणात निधी दिला जात असून हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे. सन २०२२ पर्यंत ही व्यवस्था जिल्हा परिषदेकडील कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत अत्यल्प खर्चात प्रभावीपणे चालवली जात होती. मात्र त्यानंतर ही कामे अवाढव्य दराने खाजगी ठेकेदारांना का देण्यात आली, याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही मनसेने केली आहे.
भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत असताना नवीन बोअरवेल खोदणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे विद्यमान हातपंप आणि विद्युत पंप सक्षमतेने कार्यरत राहतील यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेक ग्रामपंचायतींना खाजगी ठेकेदारांचा मोठा देखभाल खर्च परवडत नसल्याने जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या यांत्रिकी मनुष्यबळामार्फत सेवा उपलब्ध करून दिल्यास ग्रामपंचायतींनाही मोठा दिलासा मिळेल, असे मनसेने स्पष्ट केले.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ कार्यवाही करण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालू, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती देण्यात आली. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष श्री. रुपेश जाधव यांच्यासह श्री. तेजस नागवेकर, सर्वेश जाधव, रोहन शेलार, स्वप्नील नागवेकर, आशिष फुटक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

