( रायगड )
सततच्या जातीवाचक अपमान, मानसिक छळ आणि बदलीच्या धमक्यांमुळे असह्य तणावात सापडल्याचा दावा करत महाड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश तडवी यांनी थेट पोलिस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी कुटुंबासह आयुष्य संपवण्याचा इशाराही दिल्याने रायगड पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित पत्रात दोन पोलिस अधीक्षक, एक अपर पोलिस अधीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे नमूद करत, “माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आत्महत्येस हेच जबाबदार असतील,” असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
रमेश तडवी यांची १७ जानेवारी २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण येथून रायगड जिल्ह्यात बदली झाली. त्यानंतर ३१ जानेवारी २०२४ रोजी त्यांची महाड शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे यांनी सादर केलेल्या कथित ‘कसूरी अहवालाच्या’ आधारे तत्कालीन पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी त्यांची बदली नियंत्रण कक्षात केल्याचे पत्रात नमूद आहे. या निर्णयाविरोधात तडवी यांनी प्रशासकीय न्यायाधिकरणात (MAT) धाव घेतली. न्यायाधिकरणाने बदलीस स्थगिती देत त्यांना पुन्हा महाड शहर पोलिस ठाण्यात नियुक्त करण्याचे आदेश दिले.
या आदेशाविरोधात पोलिस प्रशासनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली; मात्र उच्च न्यायालयानेही न्यायाधिकरणाचा निर्णय कायम ठेवला. अखेर १० सप्टेंबर २०२५ रोजी तडवी यांनी पुन्हा महाड शहर पोलिस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला. तडवी यांनी पत्रात नमूद केले आहे की, ते आदिवासी भिल्ल समाजाचे असल्याने त्यांना वारंवार ‘खालच्या जातीचा’ म्हणून हिणवले जात होते. उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे यांनी, “तू खालच्या जातीचा आहेस; तू इथे कसा राहतो तेच बघतो, काही झाले तरी तुझी बदली करणार,” अशी धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे तसेच सपोनि जीवन हिंदुराव माने यांनीही बाहेरच्या व्यक्तींसमोर जाणीवपूर्वक जातीचा उल्लेख करून अपमान केल्याचा दावा तडवी यांनी केला आहे. “आम्ही बघून घेऊ,” अशा शब्दांत धमक्या देण्यात आल्याचेही पत्रात म्हटले आहे.
जबाबदार धरलेले अधिकारी
तडवी यांनी आपल्या पत्रात तत्कालीन पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, विद्यमान पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलिस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे व सविता गर्जे, तसेच मिलिंद खोपडे आणि जीवन माने यांची नावे नमूद केली आहेत. तडवी यांच्या म्हणण्यानुसार, काही अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे त्यांच्या विरोधात बदनामीकारक माहिती पोहोचवून वातावरण दूषित केले. सततच्या मानसिक छळामुळे कुटुंबीयही प्रचंड तणावाखाली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
नक्की वाचा: सिंधुदुर्ग किल्ल्यावर फिरताना रत्नागिरीच्या दहा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू
बेकायदेशीर अटकेसाठी दबाव?
महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान घडलेल्या एका राजकीय वादातून दोन गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी एका प्रकरणात एका राजकीय नेत्याच्या मुलाचा समावेश होता. या प्रकरणात “बनाव करून तीन जणांना बेकायदेशीररीत्या अटक करण्यासाठी दबाव टाकण्यात आला; मात्र मी त्यास नकार दिल्याने मला लक्ष्य करण्यात आले,” असा गंभीर आरोप तडवी यांनी पत्रात केला आहे.
प्रशासनाची भूमिका प्रतीक्षेत
या संपूर्ण प्रकरणामुळे रायगड पोलिस दलात अस्वस्थता पसरली असून, वरिष्ठ स्तरावरून चौकशीची मागणी होत आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून या पत्राची दखल घेतली जाईल का, तसेच आरोपांची निष्पक्ष चौकशी होईल का, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
नक्की वाचा: मुस्लीम आरक्षण रद्द निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; ‘रातोरात 5% आरक्षण का हटवलं?’ – याचिकेत सवाल

