(मुंबई)
महाराष्ट्रातील लाखो शिक्षक भरती इच्छुकांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. 28 जून 2026 रोजी होणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET 2026) पेपरफुटीच्या प्रकरणामुळे ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली आहे. भिवंडी येथे प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न संशयितांकडे आढळून आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, राज्य परीक्षा परिषदेला परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. या निर्णयामुळे राज्यातील 6 लाख 12 हजारांहून अधिक उमेदवारांवर परिणाम झाला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 28 जून 2026 रोजी राज्यातील 37 शहरांतील 1,028 परीक्षा केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घेण्यात येणार होती. मात्र, परीक्षेच्या आदल्या दिवशीच पेपरफुटीचा प्रकार उघड झाल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, आज 27 जूनच्या पहाटे भिवंडी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एका ठिकाणी छापा टाकण्यात आला. तेथे काही संशयितांकडे असलेल्या माहितीची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता, ती टीईटी 2026 च्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांशी जुळत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
सदर परिस्थिती लक्षात घेता २८ जून, २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. शिक्षक पात्रता परिक्षेबाबत अद्यावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर परीक्षा पूर्णपणे पारदर्शक वातावरणात घेणे आवश्यक असल्याचे सांगत 28 जूनची टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आला. नवीन परीक्षेची तारीख आणि पुढील सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
6 लाखांहून अधिक उमेदवारांना दिलासा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्यातील 6 लाख 12 हजारांहून अधिक उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. पुढील 2 ते 3 दिवसांत नव्या परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील 37 शहरांतील 1,028 केंद्रांवर परीक्षा नव्याने घेतली जाणार आहे.
NEET नंतर पुन्हा पेपरफुटीचा धक्का
काही दिवसांपूर्वी NEET 2026 पेपरफुटीमुळे देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता टीईटी परीक्षेतही पेपरफुटी झाल्याने परीक्षा प्रक्रियेच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. लाखो उमेदवारांच्या भवितव्याशी संबंधित परीक्षांमध्ये वारंवार होणाऱ्या गैरप्रकारांमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

