( रत्नागिरी /प्रतिनिधी )
रत्नागिरी पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यातील अनेक भागात धाडसत्र सुरू आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यात अवैध धंद्याबाबत गुन्हे दाखल केले जात आहे. मात्र ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निवळी परिसरामध्ये अवैध दारू, मटक्याचे धंदे सुरू आहेत. या अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई दुर्मिळ झाली आहे. अवैध धंदेवाले मोकाट झाले असल्याचे चित्र सद्य स्थितीत दिसून येत आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून हातखंबा आणि निवळी या दोन गावांच्या सीमेवर अवैध धंदे राजरोस सुरू आहेत. येथील बस थांब्याच्या मागील बाजूस संपूर्ण कातळ परिसर असल्याने अशा धंदेवाईकांना आयती जागा मिळाली आहे. निवळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत दारू विक्रीस बंदी आहे. परंतु हातखंबा सीमा रेषेअंतर्गत हे सर्व धंदे खुलेआम सुरू असल्याचे बोलले जात आहे. या धंदे व्यावसायिकांवर कुणाचा आशीर्वाद आहे? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
तरुणाई दिवसेंदिवस व्यसनाच्या विळख्यात सापडत आहे. व्यसनाच्या विळख्यातून तरुणांची सुटका करण्यासाठी जिल्हा पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेऊन अवैध धंद्याचे बीमोड होईल अशा कारवाया करण्याची अपेक्षा आहे. मात्र तशा स्वरूपाच्या कारवाया कुठेही करताना पोलीस प्रशासन दिसत नाही. निवळी सारख्या महामार्गालगत असणाऱ्या गावामध्ये राजरोस सुरू असणाऱ्या दारू, मटक्याच्या धद्यांमुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. स्थानिक पोलिस प्रशासन वेळप्रसंगी कारवाईचा बडगा उगारत कारवाईचा फार्स करत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जातो.
पोलिसांनी जनतेचा विश्वास संपादन करणे गरजेचे
निवळी परिसर हा जणू काही अवैध धंद्यांचे माहेरघर बनत चालला आहे. येथे अवैद्य धंद्याचे अड्डे असून पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे राजरोसपणे सुरू असल्याचे दक्ष नागरिक सांगतात, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्यामुळे अवैध धंदे बिनधास्तपणे सुरू असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांचा खाकीवर असलेला विश्वास लोप पावत आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनला आलेल्या नवीन पोलीस निरिक्षकांनी हे मटका, दारू धंदे मोडीत काढून सर्वसामान्य जनतेचा व नागरिकांचा विश्वास संपादन करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात पोलिसांचे धाडसत्र सुरू
निवडणुकीची आचारसंहिता लागतच जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिसांचे धाड सत्र सुरू झाले आहे. मात्र यामध्ये निवळी भागातील एकाही धंद्यांवर ना कारवाई, ना पोलिसांची धाड, येथील धंदेवाईकांना पोलिसांनीच अवैध धंदे करण्याचे परवाने दिलेत का? असाही प्रश्न आता निर्माण होत आहे.