(जैतापूर / राजन लाड)
मालवणी रंगभूमीचे लाडके, प्रख्यात नाटककार, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते कै. गंगाराम गवाणकर यांच्या अस्थींचे विसर्जन त्यांच्या मूळगावी राजापूर तालुक्यातील माडबन समुद्रात रविवार, दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० नंतर करण्यात येणार आहे.
या अगोदर त्यांच्या माडबन येथील राहत्या घरी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत अस्थिकलशाचे दर्शन सर्वांसाठी ठेवण्यात आले असून, त्यांच्या चाहत्यांना, मित्रपरिवाराला आणि नाट्यप्रेमींना अंतिम दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.
मुंबई येथे उपचार सुरू असताना २७ ऑक्टोबर रोजी रात्री त्यांचे दुःखद निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार मुंबईतच पार पाडण्यात आले. त्यानंतर त्यांचा अस्थिकलश आठ नोव्हेंबर रोजी माडबन येथे आणला जाणार असून दुसऱ्या दिवशी समुद्रात विसर्जन होईल, असे त्यांच्या कुटुंबीयांनी कळविले आहे.
गंगाराम गवाणकर यांचे मूळ गाव माडबन हेच त्यांचे कायमचे वास्तवस्थान होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते याच ठिकाणी स्थायिक होते आणि आपल्या लेखणीच्या व अभिनयाच्या माध्यमातून कोकणच्या भूमीचा अभिमान वाढवत होते.
त्यांनी लिहिलेली आणि रंगभूमीवर गाजलेली नाटके ‘वस्त्रहरण’, ‘वात्रट मेले’, ‘वन रूम किचन’ यांसह अनेक नाट्यप्रयोगांनी मालवणी भाषेला नवा दर्जा दिला. त्यांच्या ‘व्हाया वस्त्रहरण’ या आत्मचरित्रातून त्यांनी आपल्या आयुष्याचा नाट्यमय प्रवास हृदयस्पर्शी पद्धतीने मांडला आहे.
गवाणकर यांचे व्यक्तिमत्त्व हे केवळ नाटकापुरते मर्यादित नव्हते; ते सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून जाणारे, साधेपणाने जगणारे आणि प्रत्येकाला आपलेसे करणारे कलाकार होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण कोकण आणि मराठी नाट्यजगतावर शोककळा पसरली होती.
आता त्यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन आणि विसर्जन विधीला उपस्थित राहून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.

