( जैतापूर / राजन लाड )
जैतापूर गावातील एक अजातशत्रू व्यक्तिमत्व आणि सर्वांच्या मनात आपलेपणाने स्थान मिळवणारे जैतापूर जमातुल मुस्लिम कमिटीचे माजी अध्यक्ष हाजीमिया कादर काजी (वय 96) यांचे रविवारी (31 ऑगस्ट 2025) रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले.
हाजीमिया कादर काजी यांनी आपल्या आयुष्यातील दीर्घ काळ मुंबई येथे बेस्ट कंडक्टर म्हणून सेवा केली. त्यानंतर त्यांनी गोवा शिपयार्ड मध्येही अनेक वर्षे प्रामाणिक व निष्ठेने काम बजावले. गावातील सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक कामात त्यांचा कायम सहभाग असायचा. त्यामुळे त्यांना जैतापूरचे अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून विशेष ओळख होती.
वयाच्या 96 व्या वर्षीही त्यांची तब्येत ठणठणीत होती. दररोज सकाळ-संध्याकाळ बाजारात फेरी मारणे ही त्यांची नेहमीची दिनचर्या होती. मात्र, काल रात्री अचानक त्यांची प्राणज्योत मावळली.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सोमवारी दुपारी जैतापूर कब्रस्तान येथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. या जेष्ठ नागरिकाच्या निधनाने संपूर्ण जैतापूर परिसरात शोककळा पसरली असून गावातील प्रत्येकजण त्यांच्या आठवणींनी शोकाकुल आहे.

