(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यात प्रस्तावित अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणावरून वाद निर्माण झाला असून, रायपाटण येथे कार्यालय स्थापन करण्यास पाचल आणि आजूबाजूच्या गावांमधून तीव्र विरोध दर्शविण्यात येत आहे. पाचलसह परिसरातील जवळपास सर्व ग्रामपंचायती आणि सुमारे ३५ ते ४० गावांतील नागरिकांनी रायपाटणच्या प्रस्तावाला हरकती नोंदवत अप्पर तहसीलदार कार्यालय पाचल येथेच सुरू करण्याची मागणी केली आहे.
राज्य शासनाने २३ जून २०२६ रोजी रायपाटण येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याबाबत परिपत्रक जारी केले होते. या निर्णयावर कोणाला हरकत असल्यास ती लेखी स्वरूपात नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. या हरकती नोंदविण्याची अंतिम मुदत आज ७ जुलै होती.
अंतिम मुदतीपर्यंत पाचल परिसरातील बहुसंख्य ग्रामपंचायती, विविध सामाजिक संस्था तसेच मोठ्या संख्येने नागरिकांनी रायपाटणच्या प्रस्तावाला विरोध दर्शवत आपली हरकत प्रशासनाकडे सादर केली. पाचल तालुका कृती समितीनेही यामध्ये सक्रिय सहभाग घेत शासनाने या हरकतींचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी केली आहे.
कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पाचल हे भौगोलिकदृष्ट्या अधिक सोयीचे केंद्र असून परिसरातील नागरिकांना ये-जा करणे सुलभ आहे. शासकीय कार्यालये, बँका, वाहतूक सुविधा, बाजारपेठ तसेच इतर आवश्यक पायाभूत सुविधा पाचलमध्ये उपलब्ध असल्याने अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी पाचल हा अधिक योग्य पर्याय ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांच्या हिताचा विचार करून शासनाने कार्यालय पाचल येथे मंजूर करावे, अशी त्यांची भूमिका आहे.
अप्पर तहसीलदार कार्यालय पाचल येथे स्थापन करण्यात यावे, या मागणीसाठी पाचल तालुका कृती समितीच्या वतीने संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. निवेदन सादर करताना कृती समितीचे अध्यक्ष अशोक सक्रे, कार्यवाह किशोरभाई नारकर, कार्यालयीन सचिव तुषार पाचलकर, पाचलचे सरपंच बाबालाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, पंचायत समिती सदस्या अपेक्षा मासये, करकचे सरपंच सुरेश ऐनारकर, कारवलीचे सरपंच प्रकाश दसवंत, पाचल व्यापारी संघाचे अध्यक्ष आण्णा पाथरे, ग्रामपंचायत सदस्य विनायक सक्रे, माजी सदस्य सिद्धार्थ जाधव, युवा कार्यकर्ते समीर खानविलकर, अनिकेत सक्रे, मंगेश भोसले, शैलेश साळवी, बाबा सुतार, विहंग खानविलकर, ओमकार ताम्हणकर, श्रीराम सेवा संघाचे अध्यक्ष मंगेश (बंधू) कुडतरकर, पांगरीचे माजी सरपंच सुनील जाधव, तसेच संकेत सक्रे, कल्पेश सुतार, हर्षल बेर्डे, राजू तेलंग, निलेश बांदरकर, सतीश सुतार, बशीद ठाकूर, आर्यन वैयकूळ, सौरभ नारकर, ओम रसाळ, नंदू पांचाळ, देवा नारकर, पार तेलंग यांच्यासह परिसरातील अनेक ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, रायपाटणसंदर्भात प्राप्त झालेल्या सर्व हरकती, सूचना आणि दावे यांचे संकलन करण्याचे काम सुरू असून, हा संपूर्ण अहवाल १२ जुलैपर्यंत कोकण विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती राजापूर येथील संबंधित महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
आता या सर्व हरकतींचा अभ्यास करून शासन अंतिम निर्णय घेणार असल्याने राजापूर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या प्रस्तावित ठिकाणाकडे लागले आहे.

