( रत्नागिरी / वार्ताहर )
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि शिरीष सावंत हे दि. २८ व २९ जून रोजी दोन दिवसीय रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने विविध तालुक्यांमध्ये आढावा बैठका, संपर्क दौरे आणि पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात येणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती, सदस्य नोंदणी अभियान, संघटन विस्तार तसेच स्थानिक प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना आवश्यक मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
रविवार, दि. २८ जूनचा दौरा
- राजापूर व लांजा तालुका : सकाळी १०.०० वाजता, शासकीय विश्रामगृह, राजापूर.
- संगमेश्वर तालुका : सकाळी १०.०० वाजता, अपरांत हॉलिडे होम, देवरुख.
- रत्नागिरी तालुका : सायंकाळी ४.३० वाजता, शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी.
सोमवार, दि. २९ जूनचा दौरा
- गुहागर तालुका : सकाळी १०.०० वाजता, हेमंत हॉटेल, शृंगारतळी.
- चिपळूण व खेड तालुका : दुपारी १२.०० वाजता, अतिथी हॉटेल, चिपळूण.
- दापोली व मंडणगड तालुका : दुपारी ४.०० वाजता, मधू मालती निवास, गिम्हवणे (सतोश शिर्के यांच्या निवासस्थानी).
या बैठकींना जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, उपतालुकाध्यक्ष, तालुका सचिव, शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, गटाध्यक्ष, विभागाध्यक्ष, उपविभागाध्यक्ष, महिला आघाडीच्या पदाधिकारी, आजी-माजी पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, संघटनात्मक कामाचा आढावा, कार्यकर्त्यांच्या अडचणी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेत पुढील काळातील पक्षाच्या कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात येणार आहे.
याशिवाय प्रत्येक तालुक्यातील संघटनात्मक स्थितीचा स्वतंत्रपणे आढावा घेऊन पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आवश्यक दिशा देण्यात येणार आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने बूथस्तरावरील संघटन बांधणी, सदस्य नोंदणी मोहीम अधिक प्रभावी करण्यावर तसेच स्थानिक प्रश्नांवर पक्षाची भूमिका अधिक ठळकपणे मांडण्यावर या बैठकींमध्ये विशेष भर दिला जाणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.
या दौऱ्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटनात्मक कामाला अधिक गती मिळेल, असा विश्वास पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, महिला संघटना, आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संबंधित तालुक्यातील बैठकींना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांनी केले आहे.

