(रत्नागिरी)
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या कौंटी क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीचा प्रतिभावान क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे याने आपल्या प्रभावी गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या बळावर पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शनिवारी हर्लिंगटन मिडोज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात अविराजने गुगलीच्या जादूने सहा बळी घेत मिडलसेक्स पेशवा संघाला निर्णायक विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे, ही त्याची या स्पर्धेतील सलग चौथी सामनावीर कामगिरी ठरली आहे.
या सामन्यात अविराजने आपल्या फिरकीच्या तंत्रज्ञानाने प्रतिस्पर्धी फलंदाजांना अक्षरशः गुंतवून ठेवले. त्याने चार फलंदाजांना गुगलीवर त्रिफळाचीत केले, तर दोन फलंदाजांना लेगस्पिनवर झेलबाद करत एकूण 6 विकेटस् घेतल्या. इतकेच नव्हे तर, क्षेत्ररक्षणातही त्याने तीन अप्रतिम झेल टिपून संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. अविराजची ही अष्टपैलू कामगिरी संघासाठी निर्णायक ठरली असून, त्याच्या सामनावीर पुरस्काराची घोषणा करताना आयोजकांनी त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे विशेष कौतुक केले. इंग्लंडसारख्या क्रिकेटच्या केंद्रस्थानी कौंटी क्रिकेटमध्ये अशी दमदार उपस्थिती दर्शवणारा अविराज सध्या अनेक क्रिकेटप्रेमींच्या चर्चेचा विषय ठरत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून अविराजवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, एकीकडे तो स्थानिक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे, तर दुसरीकडे त्याच्या खेळाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दारात टकटक करणारा एक हुशार खेळाडू अशी ओळख निर्माण केली आहे.

