(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील राजिवडा परिसरात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून त्या कृत्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याची अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी शहर पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, बालसुरक्षेबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घडला. राजिवडा परिसरातील जुबेर सलीम शेख (२२) आणि मुस्तकीन गडकरी (२४) यांनी एका अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित बालक भीतीमुळे सुरुवातीला मौन बाळगून होता; मात्र आरोपींनी संबंधित कृत्याचे चित्रीकरण करून तो व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याने हा प्रकार उघडकीस आला.
गुरुवारी (१२ मार्च) पीडित मुलाच्या वडिलांच्या निदर्शनास संबंधित व्हिडिओ आला. व्हिडिओतील मुलगा स्वतःचा मुलगा असल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी त्वरित हालचाल करत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपींविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत कठोर कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, सामाजिक माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित केल्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गतही स्वतंत्र कलमे लावण्यात आली आहेत. अल्पवयीनांवरील लैंगिक गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडे अत्यंत संवेदनशीलतेने पाहिले जात आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची सूत्रे शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी स्वतःकडे घेतली आहेत. आरोपींनी संबंधित व्हिडिओ इतरत्र प्रसारित केला आहे का, तसेच या प्रकारामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तांत्रिक आणि सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

