(खेड)
राज्यातील एकही दिव्यांग व्यक्ती शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू दिली जाणार नाही. प्रत्येक पात्र दिव्यांगापर्यंत शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना पोहोचविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ठाम ग्वाही राज्याचे महसूल, गृह (शहरे), ग्रामविकास व पंचायत राज, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.
खेड नगर परिषदेच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी राखीव ५ टक्के निधीतून थेट आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले. खेड येथील स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाला नगराध्यक्ष माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, माजी आमदार संजय कदम, जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, कुंदन सातपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
योगेश कदम म्हणाले की, शासनाकडून दिव्यांगांसाठी अनेक महत्त्वाकांक्षी आणि कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. मात्र, अनेक पात्र लाभार्थ्यांकडे यूडीआयडी (UDID) प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना या योजनांचा लाभ मिळू शकत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी दिव्यांगांना त्यांच्या परिसरातच UDID प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांचा अधिकाधिक दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
खेड नगर परिषदेने यावर्षी दिव्यांग बांधवांना थेट आर्थिक मदत देण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले. दिव्यांगांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नगर परिषद सातत्याने पुढाकार घेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
खेड नगर परिषदेच्या या उपक्रमामुळे स्थानिक दिव्यांग बांधवांना तात्काळ आर्थिक आधार मिळाला असून, आगामी काळात UDID प्रमाणपत्राच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये नव्या आशा, विश्वास आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

