(मुंबई)
पुण्यातील लोहगड येथे घडलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन यांच्याविरुद्ध पोलिसांचा तपास सुरू असतानाच, कटात कुटुंबातील अन्य व्यक्तींचा सहभाग होता का, याचाही तपास आता वेगाने सुरू झाला आहे.
तपासाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी सिया गोयलच्या भावाची चौकशी सुरू केली असून, संपूर्ण कटामध्ये त्याची किंवा इतर कुटुंबीयांची काही भूमिका होती का, याचा तपास केला जात आहे. या प्रकरणात आता सियाच्या भावाची, म्हणजे साहिल गोयलची चौकशी करण्यात येत आहे. केतनच्या हत्या प्रकरणात सिया आणि चेतन यांच्याबरोबरच अजून काही लोकांचा हात असण्याची शक्यता विशाल अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे. यामुळे या प्रकरणात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केतन अग्रवाल यांच्या डोक्यावर विग असल्याची माहिती लग्नापूर्वीच सिया गोयल आणि तिच्या कुटुंबाला देण्यात आली होती. त्यामुळे ही बाब लपवण्यात आली होती, असा दावा चुकीचा असल्याचे केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी स्पष्ट केले. “केतन विग वापरत होता, ही माहिती सियाला आणि तिच्या कुटुंबीयांना आधीपासूनच होती. मात्र, एखादी व्यक्ती विग वापरते, हे तिच्या हत्येचे कारण ठरू शकत नाही,” असे ते म्हणाले.
विशाल अग्रवाल यांनी पुढे सांगितले की, “जर सियाला हे लग्न मान्य नसेल, तर तिने त्याला नकार देऊ शकत होती. लग्न मोडणे हा तिच्यासाठी सोपा पर्याय होता. मात्र, त्यासाठी केतनची हत्या करण्याची गरज नव्हती.”
पीडित कुटुंबाची मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी
दरम्यान, मृत केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि प्रकरणाचा जलद निकाल लागावा, यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबाचे सांत्वन करत दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा होईल, असे आश्वासन दिले. तसेच फास्ट ट्रॅक कोर्टासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश विधी व न्याय विभागाला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील
या प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणीही विशाल अग्रवाल यांनी केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली असून, उज्ज्वल निकम यांनीही या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून काम करण्यास संमती दर्शवल्याची माहिती मिळाली आहे.
सियाच्या वडिलांचे वक्तव्य चर्चेत
या घटनेनंतर सिया गोयल यांच्या वडिलांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मुलीवर या विवाहासाठी कोणताही कौटुंबिक दबाव नव्हता. त्यांच्या म्हणण्यानुसार, केतन अग्रवाल यांच्याशी विवाहास सियाने स्वतःच्या इच्छेने होकार दिला होता. त्यामुळे जर तिचे इतर कोणाशी प्रेमसंबंध होते, तर तिने विवाहास नकार का दिला नाही, हा प्रश्न आता तपासाचा महत्त्वाचा भाग बनला आहे.
या प्रकरणात पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी सुरू असून, इलेक्ट्रॉनिक पुरावे, कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण कटाचे स्वरूप आणि सर्व संबंधितांची भूमिका स्पष्ट होणार आहे.

