(खेड/ वार्ताहर)
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईच्या शाखा तालुका खेडच्या वतीने आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ‘विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२६’ रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सह्याद्री स्कूल, भांडुप पश्चिम, मुंबई येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक भावना निर्माण करणे, हा या सोहळ्याचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी स्वर्गीय समाजनेते, सभासद आणि समाजबांधवांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
शाखाध्यक्ष श्री. शंकर बाईत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला संघ निरीक्षक, संघ उपाध्यक्ष तथा खेड तालुका पालकमंत्री मा. श्री. उदय कठे आणि संघ कार्यकारिणी सदस्य श्री. नवनीत पिंपरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाखाध्यक्ष श्री. शंकर बाईत यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. समाजाच्या प्रगतीत आणि उन्नतीत विद्यार्थी व युवा पिढीचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भविष्यातही अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
संघ उपाध्यक्ष तथा खेड तालुका पालकमंत्री मा. श्री. उदय कठे यांनी आजची तरुण पिढी आणि विद्यार्थी वर्ग हाच समाजाचा खरा पाया असल्याचे नमूद केले. गुणगौरव सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना प्रोत्साहन देणे समाजाच्या प्रगतीसाठी गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
संघ कार्यकारिणी सदस्य श्री. नवनीत पिंपरे यांनीही विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यातून इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन नेत्रदीपक कामगिरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
श्री. नितीन खापरे यांनी आपल्या मनोगतात स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्याची गरज व्यक्त केली. समाजातील जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत आणि ज्यांना पुस्तकांची आवश्यकता आहे, त्यांना स्वतःच्या माध्यमातून मोफत पुस्तके उपलब्ध करून देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. समाजाच्या शाखेनेही यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगताना अशा उपक्रमांतून अधिकारी घडण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांना मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्याला संघ प्रतिनिधी श्री. मंगेश मांडवकर, उपाध्यक्ष श्री. प्रकाश गोटल, श्री. जयवंत वामने, उपसचिव श्री. रुपेश तांबट, हिशोब तपासणी श्री. संजय जाधव, कार्यकारिणी सदस्य श्री. राजाराम निकम व श्री. विलास कावणकर, युवा अध्यक्ष प्रवीण शिबे, युवा सचिव अॅड. कल्पेश बांद्रे, युवा खजिनदार शैलेश शिगवण, उपाध्यक्ष श्री. गणेश झुजम, उपसचिव शिरीष कदम, श्री. रोहित भाईजे यांच्यासह समाजबांधव, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखा सचिव श्री. संदीप दोडेकर यांनी केले, तर उपाध्यक्ष श्री. प्रकाश गोठल यांनी आभार मानले. उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा संस्मरणीय ठरला.


