(खेड / वार्ताहर)
अहमद चौगुले यांचे आठ महिन्यांपूर्वी हरवलेले पाकीट रिक्षाचालक सिकंदर कुंभार्लीकर यांना सापडले. या पाकिटात चार हजार दोनशे रुपये तसेच महत्त्वाची कागदपत्रे होती. तब्बल आठ महिन्यांनंतरही पाकिटातील रक्कम आणि कागदपत्रे जशीच्या तशी ठेवून सिकंदर कुंभार्लीकर यांनी ते अहमद चौगुले यांच्याकडे प्रामाणिकपणे परत केले.
सिकंदर कुंभार्लीकर हे भारतीय जनता पार्टी रिक्षा संघटनेचे रिक्षाचालक आहेत. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल अहमद चौगुले यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, युसूफ चौगुले, वहिद चौगुले, भाजपा अल्पसंख्याक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक व गटनेते रहीम सहिबोल, भाजपा युवा मोर्चाचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, साजिद रावल आणि भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार उपस्थित होते.
सिकंदर कुंभार्लीकर यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे समाजासमोर एक आदर्श निर्माण झाला आहे. पैशांसह महत्त्वाची कागदपत्रे असलेले पाकीट तब्बल आठ महिन्यांनंतरही जसेच्या तसे परत करून त्यांनी माणुसकी आणि प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले. अशाच प्रकारचा प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी इतर रिक्षाचालकांनीही आपल्या पुढील वाटचालीत जपावी, असे आवाहन ॲड. वैभव खेडेकर यांनी यावेळी केले.

