(खेड/ रत्नागिरी)
किरकोळ कारणावरून उसळलेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याची घटना लोटेमाळ-माळवाडी येथे रविवारी (ता. ३) दुपारी घडली. चिकन मसाला खरेदीसाठी दुकानात गेलेल्या महिलेने एकेरी भाषेत संवाद साधल्याच्या कारणावरून दुकान मालकिणीने तिच्यावर मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दुकान मालकिणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नितेश संजय भालेकर (वय २४, रा. लोटेमाळ-माळवाडी, खेड) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार रसिका शंकर नलावडे (रा. पटवर्धन, लोटे, खेड) हिच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीची चुलत बहीण गौरी भालेकर आणि तिची मैत्रीण स्वरा काते या दोघी चिकन मसाला खरेदीसाठी संबंधित दुकानात गेल्या होत्या. यावेळी गौरी भालेकर हिने दुकान मालकिणीशी एकेरी भाषेत संवाद साधल्याने वाद निर्माण झाला. या वादातून संतापलेल्या मालकिणीने तिच्यावर मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

