(नवी दिल्ली)
दिल्ली-गुरुग्राममधील एका IVF सेंटरविरोधात अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले असून, IVF प्रक्रियेनंतर जन्मलेल्या जुळ्या मुलींचा DNA त्यांच्या आई-वडिलांशी जुळत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेमुळे IVF प्रक्रियेतील निष्काळजीपणा, भ्रूण अदलाबदली किंवा गंभीर वैद्यकीय त्रुटींची शक्यता व्यक्त होत असून, संपूर्ण प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे.
राहुल राठोड आणि त्यांची पत्नी मीनू राठोड यांनी मूल होण्यासाठी IVF प्रक्रियेचा पर्याय निवडला होता. त्यानंतर मीनू यांनी ५ जानेवारी २०२५ रोजी जुळ्या मुलींना जन्म दिला. सुरुवातीला कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र काही दिवसांनी मुलींच्या चेहऱ्यावरील वैशिष्ट्ये आणि दिसण्यात असलेला फरक पाहून दाम्पत्याला संशय आला. विशेषतः एका मुलीचा चेहरा पूर्णपणे वेगळा वाटत असल्याने त्यांनी DNA चाचणी करण्याचा निर्णय घेतला.
DNA अहवाल समोर आल्यानंतर दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. अहवालानुसार, दोन्ही मुलींचा DNA राहुल किंवा मीनू राठोड यांच्यापैकी कुणाशीही जुळत नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर या दाम्पत्याने IVF प्रक्रियेत गंभीर गोंधळ किंवा भ्रूण अदलाबदली झाल्याचा आरोप केला आहे.
“नऊ महिने गर्भात वाढवलं, पण मुली आमच्या नाहीत”
मीनू राठोड यांनी माध्यमांशी बोलताना भावनिक प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “चार महिने मी इंजेक्शनचा कोर्स घेतला. त्यानंतर या मुलींना नऊ महिने माझ्या गर्भात वाढवलं. पण DNA टेस्टने धक्कादायक सत्य समोर आणलं. या मुलींचा काहीही दोष नाही, पण त्या आमच्या नाहीत. आम्हाला आमची खरी मुलं परत मिळावीत.”
राहुल राठोड यांनी सांगितले की, “मुलींना काही दिवसांनी पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यात आमच्याशी साधर्म्य दिसत नव्हतं. त्यांचे डोळे आणि चेहरे पूर्वोत्तर भारतातील लोकांसारखे वाटत होते. त्यामुळे आम्ही DNA टेस्ट केली आणि आमची भीती खरी ठरली.”
IVF सेंटरने आरोप फेटाळले
हे संपूर्ण प्रकरण दिल्ली-गुरुग्राममधील एका IVF सेंटरशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. राठोड दाम्पत्याने सेंटरकडे याबाबत विचारणा केली असता, कोणतीही चूक किंवा निष्काळजीपणा झालेला नसल्याचे उत्तर देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
राहुल राठोड यांच्या मते, “आम्ही IVF सेंटरशी संपर्क साधला, पण त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. उलट आम्हालाच प्रश्न विचारण्यात आले. भ्रूण अदलाबदली झाली असावी किंवा जन्मानंतर मुलींची अदलाबदली झाली असावी, असा आमचा संशय आहे.”
प्रकरण न्यायालयात; FIRच्या आदेशालाही स्थगिती
या प्रकरणानंतर दाम्पत्याने न्यायालयात धाव घेतली. मार्च २०२६ मध्ये दिल्लीतील न्यायालयाने राठोड दाम्पत्याच्या बाजूने निर्णय देत FIR दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र IVF सेंटरने या आदेशाला आव्हान दिल्यानंतर ५ जून रोजी त्या आदेशाला स्थगिती देण्यात आली.
दरम्यान, न्यायालयाने IVF सेंटरमधील दस्तावेज आणि वैद्यकीय नोंदी जप्त करण्याचे निर्देश दिल्याची माहिती राहुल राठोड यांनी दिली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, दिल्ली सरकारच्या ART विभागानेही या घटनेची दखल घेतली आहे.
“२०२५ मध्ये IVF केलेल्या जोडप्यांनी DNA टेस्ट करावी”
राहुल राठोड यांनी आणखी गंभीर दावा करत २०२५ मध्ये या IVF सेंटरमध्ये उपचार घेतलेल्या इतर जोडप्यांनाही DNA चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. “आमच्यासारखी परिस्थिती इतर कोणावरही येऊ नये. त्यामुळे संबंधित जोडप्यांनी DNA टेस्ट करून घ्यावी,” असे त्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणामुळे देशभरात IVF प्रक्रियेच्या सुरक्षिततेबाबत आणि वैद्यकीय व्यवस्थेतील पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, पुढील तपासात नेमकं सत्य काय समोर येतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

