( पुणे )
सचिन शिराळे या पुणे खडकीतील सफाई कर्मचाऱ्याने आपल्या जिद्द आणि कठोर परिश्रमांच्या जोरावर थेट जागतिक क्रीडा मंचावर भारताचा तिरंगा फडकावला आहे. जागतिक मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धा मध्ये सचिन यांनी एक सुवर्ण आणि दोन रौप्यपदकं पटकावत प्रेरणादायी कामगिरी केली आहे.
खडतर परिस्थितीतून यशाकडे वाटचाल
खडकी, पुणे येथील महादेववाडी परिसरात साध्या पत्र्याच्या घरात राहणाऱ्या सचिन यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. अनुकंपा तत्वावर खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये सफाई कर्मचारी म्हणून नोकरी मिळाल्यानंतर त्यांचा संघर्ष सुरू झाला. दररोज पहाटे उठून रस्ते साफ करणे, कचरा उचलणे, ड्रेनेज लाईन स्वच्छ करणे अशी मेहनतीची कामं करत त्यांनी कधीही कामाची लाज बाळगली नाही. त्याच कामातून कुटुंबाचा सांभाळ करत त्यांनी आपली स्वप्नं जिवंत ठेवली.
दिवसभर काम, संध्याकाळी सराव
दिवसभराच्या कष्टानंतरही सचिन संध्याकाळी मैदानावर नियमित सरावासाठी जातात. दररोज 2 ते 3 तासांचा कठोर सराव, सातत्य आणि स्वतःशी चाललेली स्पर्धा यामुळे त्यांनी आपली क्षमता विकसित केली. आई रमाबाई, पत्नी अश्विनी आणि मुली संस्कृती व स्नेहल यांचा त्यांना मोठा आधार मिळाला. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच त्यांनी काम आणि खेळ यामध्ये समतोल राखला.
थायलंडमध्ये मिळवलं जागतिक यश
थायलंडमध्ये झालेल्या स्पर्धेत सचिन यांनी 5,000 मीटर चालण्याच्या प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तसेच 5,000 मीटर आणि 1,500 मीटर धावण्याच्या स्पर्धांमध्ये दोन रौप्यपदकं पटकावली. सुमारे 46 अंश तापमानात स्पर्धा होत असताना अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी माघार घेतली. मात्र सचिन यांनी हार न मानता चीन, जपान, कोरिया आणि श्रीलंका येथील खेळाडूंना मागे टाकत विजय मिळवला.
मित्र, कुटुंबीय आणि सहकाऱ्यांचा मोलाचा वाटा
सचिनच्या यशामागे अनेकांचा हातभार आहे. दुर्योधन भापकर म्हणाले, “सचिनची जिद्द आणि प्रामाणिकपणा विलक्षण आहे.” तर मित्र निलेश खुडे म्हणाले, “दिवसभर कष्ट करूनही तो सरावासाठी येत असे, त्याची मेहनतच त्याला इथपर्यंत घेऊन आली.” पत्नी अश्विनी शिराळे म्हणाल्या, “त्याने कधी हार मानली नाही, आज त्याने ते सिद्ध करून दाखवलं.” आई रमाबाई शिराळे भावूक होत म्हणाल्या, “माझा मुलगा देशासाठी पदक जिंकतोय, याचा खूप अभिमान आहे.”
सचिन शिराळे म्हणाले, “मी कठीण परिस्थितीतून इथपर्यंत आलो आहे. आता माझं लक्ष्य ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन देशाचं नाव उज्ज्वल करणं आहे.” त्यांनी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाचे सहकार्याबद्दल आभार मानले. सचिन शिराळे यांची कहाणी ही केवळ एका खेळाडूची नाही, तर प्रत्येक सामान्य माणसासाठी प्रेरणा आहे. प्रतिकूल परिस्थितीतही मोठी स्वप्नं पाहून ती पूर्ण करण्याची ताकद त्यांच्या यशातून दिसून येते. खडकीतील झोपडपट्टीतून जागतिक स्तरावर पोहोचलेला हा खेळाडू आज देशाचा अभिमान ठरला आहे.

