(पंढरपूर / वृत्तसंस्था)
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोणताही अपवाद न करता व्हीआयपी दर्शनाचा लाभ न घेता केवळ श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतले. त्यांच्या या कृतीमुळे ‘नियम सर्वांसाठी समान’ असल्याचा स्पष्ट संदेश गेल्याची चर्चा दिवसभर पंढरपुरात रंगली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आषाढी वारीच्या काळात व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद केली आहे. या निर्णयानंतर अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांनीही वारकऱ्यांच्या दर्शनाला प्राधान्य देत नियमांचे पालन करण्यास सुरुवात केली आहे.
व्हीआयपी दर्शनाऐवजी मुखदर्शन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिरात कोणतीही विशेष सुविधा न घेता केवळ मुखदर्शन घेतले. त्यांच्या या निर्णयामुळे आषाढी एकादशीला वारकऱ्यांच्या दर्शनाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संदेश गेला असल्याची भावना भाविक आणि स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. राजकीय वर्तुळातही शिंदे यांच्या या कृतीची चर्चा रंगली असून, लोकप्रतिनिधींनीही वारकऱ्यांच्या सोयीचा विचार करावा, असा अप्रत्यक्ष संदेश यातून दिला गेल्याचे मानले जात आहे.
दर्शन व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी
आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात दाखल झालेल्या उपमुख्यमंत्री शिंदे यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील दर्शन व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. भाविकांना दर्शनासाठी कोणताही अडथळा येऊ नये, रांगा सुरळीत राहाव्यात आणि जलद दर्शनाची व्यवस्था प्रभावीपणे सुरू राहावी यासाठी प्रशासनाने केलेल्या नियोजनाचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही मुखदर्शन घेतले.
मंदिर संवर्धन आणि विकासकामांचा आढावा
मंदिर समितीच्या वतीने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शाल आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मंत्री प्रकाश आबिटकर आणि योगेश कदम यांचाही सत्कार करण्यात आला. यानंतर शिंदे यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या मंदिर जतन व संवर्धनाच्या कामांची, प्रस्तावित नवीन दर्शन मंडपाची आणि मंदिर परिसरातील विविध विकासकामांची माहिती घेतली.
पंढरपूर कॉरिडॉरबाबत नागरिकांना दिलासा
पंढरपूर विठ्ठल मंदिर कॉरिडॉर योजनेबाबत नागरिकांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले की, “नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही.” त्यामुळे कॉरिडॉर प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या भावना आणि सूचनांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
पत्रा शेड येथील रिद्धी-सिद्धी दर्शन मंडपात रांगेत उभ्या असलेल्या वारकऱ्यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःच्या हस्ते पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. यावेळी त्यांनी वारकऱ्यांशी थेट संवाद साधून प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा, स्वच्छता, वैद्यकीय सेवा आणि इतर व्यवस्थेबाबत माहिती घेतली तसेच त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या.
चंद्रभागा नदीतील स्वच्छतेची पाहणी
यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चंद्रभागा नदीपात्र आणि वाळवंट परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली. आरोग्य विभागाच्या वैद्यकीय कक्षाचे उद्घाटन करून त्यांनी होडीतून नदीपात्राची पाहणी केली. यावेळी नदीतील सुरक्षा व्यवस्था, लाईफ जॅकेटची उपलब्धता, बचाव यंत्रणा आणि आपत्कालीन तयारीचा आढावा घेत स्वच्छता कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला.
आयसीयूतील रुग्णांची विचारपूस, वृक्षारोपणही केले
भक्तीसागर येथील आपत्कालीन वैद्यकीय केंद्राला भेट देत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस केली. डॉक्टरांशी चर्चा करून आवश्यक सूचना दिल्यानंतर त्यांनी भक्तीसागर परिसरात वृक्षारोपणही केले.
‘वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासन 24 तास सज्ज’
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आषाढी वारीसाठी आलेल्या लाखो वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी शासन आणि प्रशासन 24 तास कार्यरत आहे. दर्शन व्यवस्था, आरोग्य सेवा, स्वच्छता, सुरक्षा आणि वाहतूक यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत असून, आषाढी वारी निर्विघ्न आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी सर्व विभाग समन्वयाने कार्यरत आहेत.”
या दौऱ्यात सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजित पाटील, आमदार राजू खरे, आमदार तानाजी सावंत, नगराध्यक्षा प्रणिता भालके, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

