(संगमेश्वर / एजाज पटेल)
निर्भीड पत्रकार, बहुजन समाजाचे कैवारी आणि कुणबी सेनेचे ज्येष्ठ नेते स्व. विलास होडे यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त बुधवार, दि. १ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता कोंड्ये येथील देवळाची वाडी परिसरातील समाज मंदिरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विलास होडे प्रबोधिनीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
स्व. विलास होडे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत अन्यायाविरुद्ध सातत्याने आवाज उठविला. तसेच कुणबी सेनेच्या माध्यमातून बहुजन समाज, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या कार्याची आठवण आजही संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांच्या मनात कायम आहे.
त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त यावर्षीही विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार असून, समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचा ‘सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’ देऊन गौरव केला जाणार आहे. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
या स्मृतिसोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विलास होडे प्रबोधिनीचे अध्यक्ष युयुत्सु आर्ते असतील. प्रमुख उपस्थिती म्हणून माजी पंचायत समिती सभापती शर्वरी वेल्ये, जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, विशाखा कुवळेकर, सरपंच महेश देसाई, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सागर देसाई तसेच राजाराम पडये उपस्थित राहणार आहेत.
स्व. विलास होडे यांच्या कार्याचा वारसा समाजोपयोगी उपक्रमांतून पुढे नेण्याचा प्रबोधिनीचा प्रयत्न असून, या स्मृतिसोहळ्यास पत्रकार, कुणबी सेनेचे कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विलास होडे प्रबोधिनी व कोंड्ये ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

