( संगमेश्वर / एजाज पटेल )
विकेंड संपल्यानंतर मुंबईकडे परतणाऱ्या वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे रविवारी सायंकाळी संगमेश्वर शहर आणि परिसर वाहतूक कोंडीने अक्षरशः ठप्प झाला. सुमारे 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना तासनतास अडकून राहावे लागले. मात्र संगमेश्वर पोलिसांनी केलेल्या तातडीच्या आणि शर्थीच्या प्रयत्नांमुळे अखेर ही कोंडी फोडण्यात यश आले आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.
रविवारी संध्याकाळनंतर अचानक वाहनांची संख्या वाढल्याने संगमेश्वर एसटी स्थानक परिसर, देवरुख राज्य मार्ग आणि सोनवी पुलापासून शास्त्री पूलपर्यंत सर्व मार्गांवर वाहतूक संथ झाली. सुरुवातीला चौकात पोलीस नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली. उकाडा, वाहनांचा धूर आणि संथ गतीमुळे प्रवासी त्रस्त झाले होते.
महामार्गावरील रखडलेली कामे ही कोंडीची मुख्य कारणे ठरत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. कोळंबे, कुरधुंडा आणि माभळे येथे सुरू असलेले अपूर्ण काम, रस्त्यावरील खड्डे आणि एकेरी मार्गावर सुरू असलेली दुहेरी वाहतूक यामुळे वाहनांचा वेग कमी झाला. त्यातच अरुंद सोनवी पुलावर एकाच वेळी अवजड वाहने आल्याने कोंडीत अधिक भर पडली. वाहतूक टाळण्यासाठी काही वाहनचालकांनी बाजारपेठेतील अंतर्गत रस्त्यांचा वापर केल्याने बाजारपेठेतही कोंडी निर्माण झाली.
परिस्थितीची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी तातडीने हालचाली करत वाहतूक नियंत्रण हाती घेतले. हेड कॉन्स्टेबल चेतन उत्तेकर यांनी मुख्य चौकात, तर पोलिस कर्मचारी अनिकेत वांगड यांनी सोनवी पुलाजवळ उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. रात्री उशिरापर्यंत त्यांनी रस्त्यावर उभे राहून कोंडी नियंत्रणात आणली. अखेर उशिरा रात्री वाहतूक सुरळीत झाल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. पोलिसांच्या तत्परतेमुळेच मोठा अपघात टळला आणि प्रवास शक्य झाला, अशी प्रतिक्रिया अनेक वाहनचालकांनी दिली.
दरम्यान, वारंवार होणाऱ्या अशा कोंडीपासून कायमस्वरूपी दिलासा मिळवण्यासाठी महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी आता प्रवाशांकडून जोर धरत आहे.

