(संगमेश्वर )
वीज वितरण कंपनीच्या संगमेश्वर-कुरधुंडा कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या चौघा कामगारांनी विद्युत लाईनवरील भेल्याचे झाड किसवण्याच्या कामाच्या बहाण्याने हापूस आंब्यांची चोरी करून झाडांचे नुकसान केल्याचा आरोप निढळेवाडी येथील ज्येष्ठ शेतकरी प्रभाकर वाडकर यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
प्रभाकर वाडकर यांच्या मालकीच्या जागेतून विद्युत वाहिनी गेली असून, त्याठिकाणी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी झाडांच्या फांद्या किसवण्यासाठी आले होते. मात्र, यावेळी संबंधित कामगारांनी हापूस आंब्यांच्या झाडांवरील आंबे तोडून नेल्याचा तसेच झाडांच्या मोठ्या फांद्या तोडून नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकाराबाबत वाडकर यांनी महावितरणच्या कुरधुंडा शाखा अभियंता तसेच संगमेश्वर उपकार्यकारी अभियंत्यांकडे लेखी तक्रार करून नुकसानभरपाईची मागणी केली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी अखेर संगमेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेत संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
“वीज लाईनवरील भेल्याचे झाड किसवण्याचा बहाणा करून हापूस आंबे चोरून नेण्यात आले. तसेच झाडांचेही नुकसान करण्यात आले आहे. संबंधितांकडून नुकसानभरपाई मिळावी आणि चौकशी करून कारवाई व्हावी,” अशी मागणी प्रभाकर वाडकर यांनी केली आहे.
दरम्यान, या तक्रारीमुळे आता पोलिस आणि महावितरण प्रशासन काय भूमिका घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

