(चिपळूण / प्रतिनिधी)
चिपळूण शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या प्रतिबंधित गुटख्याची बेकायदेशीर विक्री आणि साठवणुकीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांनी केली आहे. यासंदर्भात चिपळूण पोलिसांना एक सविस्तर लेखी निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकअधिकार समितीचे विभागीय संघटक अनिकेत साळवी, राधाई प्रतिष्ठानच्या राधा लवेकर, छावा मराठा योद्धा संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कांबळी आणि पत्रकार शकील तांबे यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी चिपळूणच्या पोलीस निरीक्षकांना हे निवेदन सुपूर्द केले.
शहरातील मुख्य बाजारपेठा, बसस्थानक परिसर आणि विशेषतः शाळा तसेच महाविद्यालयांच्या परिसरात खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे. या बेकायदेशीर व्यवसायामुळे युवक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर व्यसनाच्या आहारी जात असून त्यांच्या आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
या वाढत्या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी तातडीने छापे टाकून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच गुटखा विक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी ठाम मागणी संघटनांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, अन्न व औषध प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनाही पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

