(नवी दिल्ली)
इराण-इस्रायल संघर्ष आणि होर्मुज सामुद्रधुनीतील सागरी वाहतुकीवरील अडथळ्यांमुळे निर्माण झालेले एलपीजी (LPG) संकट आता पूर्णपणे निवळले आहे. मध्यपूर्वेतील तणाव कमी झाल्यानंतर होर्मुज मार्गावरील जहाजांची वाहतूक पूर्ववत सुरू झाली असून, भारतातील एलपीजी पुरवठाही युद्धपूर्व स्थितीत आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरबाबत महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेतला आहे.
कमर्शियल LPG पुरवठ्यावरचे सर्व निर्बंध हटवले
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध तात्काळ प्रभावाने हटविण्यात आले आहेत. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, कॅटरर्स, छोटे व्यावसायिक तसेच विविध उद्योगांना आता पूर्वीप्रमाणे कोणत्याही मर्यादेशिवाय गॅस सिलिंडर उपलब्ध होणार आहेत.
टंचाईमुळे सरकारने घेतले होते कठोर निर्णय
होर्मुज सामुद्रधुनीतील तणावामुळे भारतात एलपीजी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला होता. घरगुती ग्राहकांना गॅसचा तुटवडा जाणवू नये म्हणून केंद्र सरकारने ‘अत्यावश्यक वस्तू कायदा’ अंतर्गत व्यावसायिक आणि औद्योगिक एलपीजी पुरवठ्यावर निर्बंध लादले होते.
याशिवाय पेट्रोकेमिकल आणि इतर डाउनस्ट्रीम उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या C3-C4 स्ट्रीम्सचा वापर थांबवून तो संपूर्ण साठा एलपीजी उत्पादनासाठी वळविण्यात आला होता. आता पुरवठा सुरळीत झाल्यामुळे हे सर्व निर्बंध मागे घेण्यात आले असून, बल्क एलपीजी पुरवठाही पूर्ववत करण्यात आला आहे.
कमर्शियल सिलिंडरचे दर कमी होणार
पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर आता कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आखाती भागातील युद्धामुळे युद्धापूर्वी १,६९१ रुपये असलेला कमर्शियल सिलिंडर तब्बल ३,११३.५० रुपयांपर्यंत महागला होता. आता पुरवठा सुधारल्याने आगामी काळात सिलिंडरच्या दरात कपात होण्याची अपेक्षा आहे. तसे झाल्यास गॅस महागल्यामुळे वाढविण्यात आलेले हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर कमी होणार का, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

