(मुंबई)
मुंबईतील मलबार हिल परिसरातील महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या अधिकृत निवासस्थान असलेल्या राजभवनातील लोक भवन परिसरात सोमवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली. सुरक्षा ड्युटीवर तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दल (SRPF) जवानाने आपल्या सर्व्हिस शस्त्रातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत जवानाचे नाव कौस्तुभ सांगळे (वय 26) असून ते एसआरपीएफ ग्रुप 16, कोल्हापूर येथे पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत होते. सध्या त्यांची नियुक्ती मुंबईतील राजभवनाच्या सुरक्षेसाठी करण्यात आली होती.
ड्युटीदरम्यान घडली घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौस्तुभ सांगळे हे राजभवनातील लोक भवन येथे गार्ड ड्युटीवर तैनात होते. ड्युटी सुरू असतानाच त्यांनी आपल्या सर्व्हिस रायफलमधून स्वतःवर गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकताच इतर सुरक्षा कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राजभवन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच मलबार हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. प्राथमिक तपासात घटनास्थळावर कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. कौस्तुभ सांगळे यांनी हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याचा तपास सुरू असून कौटुंबिक कारण, वैयक्तिक अडचणी किंवा इतर कोणता तणाव याची सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे. यासाठी राजभवनातील सहकारी जवान आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे जबाबही नोंदवले जात आहेत.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू असून, आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे सांगितले आहे.

