(पुणे)
नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार आणि तिच्या हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय 65) याला दोषी ठरवले आहे. हा गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ स्वरूपाचा असल्याचे नमूद करत सरकारी पक्षाने आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने शिक्षेबाबतचा निर्णय राखून ठेवला असून, 29 जून रोजी आरोपीला जन्मठेप की मृत्युदंड, याबाबत अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.
58 दिवसांत पूर्ण झाला खटला
या प्रकरणातील सुनावणी अवघ्या 58 दिवसांत पूर्ण झाली असून, राज्यातील जलदगतीने निकाली निघालेल्या महत्त्वाच्या खटल्यांपैकी हा एक मानला जात आहे. आरोपीला न्यायालयातून बाहेर नेत असताना न्यायालय परिसरात उपस्थित नागरिकांनी कठोर शिक्षेची मागणी करत घोषणाबाजी केली.
गंभीर कलमांखाली दोषारोप सिद्ध
आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत अपहरण, बलात्कार, खून, विनयभंगासाठी बळजबरी तसेच पोक्सो कायद्यातील विविध गंभीर कलमांनुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपीला त्याच्यावरील सर्व आरोप सिद्ध झाल्याचे सांगत संबंधित कलमांनुसार होऊ शकणाऱ्या शिक्षेची माहितीही दिली.
वैद्यकीय, डीएनए आणि CCTV पुराव्यांवर भर
न्यायालयाने नमूद केले की, डीएनए अहवाल, न्यायवैद्यकीय तपास, सीसीटीव्ही फुटेज, परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब या सर्वांच्या आधारे आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला आहे. तपासादरम्यान पीडित मुलीच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा आढळल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले होते. तसेच गुन्हा अत्यंत कमी कालावधीत घडल्याचेही तपासातून स्पष्ट झाल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयात मांडले.
सरकारी पक्षाची फाशीची मागणी
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा संदर्भ देत आरोपीने पूर्वनियोजित आणि अत्यंत क्रूर पद्धतीने हा गुन्हा केल्याचा युक्तिवाद केला. आरोपीविरुद्ध यापूर्वीही गुन्ह्यांची नोंद असल्याचा उल्लेख करत, समाजासाठी तो धोकादायक असल्याने त्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सरकारी पक्षाने केली.
बचाव पक्षाचा युक्तिवाद
बचाव पक्षाने पोलिसांनी सादर केलेले पुरावे मुख्यतः परिस्थितीजन्य असल्याचा दावा केला. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची अखंड साखळी सिद्ध झालेली नसल्याने हा खटला ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ श्रेणीत मोडत नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला.
विशेष न्यायालय आता दोन्ही बाजूंचे युक्तिवाद, सादर झालेले पुरावे आणि सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या निकषांचा विचार करून 29 जून रोजी आरोपीला मृत्युदंड की जन्मठेप, याबाबत अंतिम निर्णय सुनावणार आहे.

