(मुंबई)
नागपूर विभागातील बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्याचा मुख्य आरोपी निलेश वाघमारे यांना अखेर सायबर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेल्या वाघमारे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांना धरमपेठ येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली.
वाघमारे हे भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक म्हणून कार्यरत होते. २०१९ ते २०२५ दरम्यान, त्यांनी नागपूर विभागात 233 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. ही बाब उपसंचालक उल्हास नरड यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीच्या अहवालातून उघड झाली होती.
घोटाळ्याची पार्श्वभूमी
चौकशी अहवालानंतर कनिष्ठ प्रशासन अधिकारी रवींद्र पाटील यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर निलेश वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, आणि ते तत्काळ फरार झाले. या प्रकरणात उपसंचालक उल्हास नरड आणि शिक्षक पराग बुगडे यांनाही अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांनी वाघमारे यांना निलंबित करण्यात आले.
राज्यव्यापी चौकशी आणि एसआयटीची स्थापना
घोटाळा फक्त नागपूर विभागापुरता मर्यादित नसून, तो राज्यभर पसरलेला असण्याची शक्यता लक्षात घेता, पावसाळी अधिवेशनात या प्रकरणाची संपूर्ण राज्यात चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली. सदर एसआयटीची स्थापना पुणे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे.
दरम्यान, अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने, चौकशी पूर्ण होईपर्यंत शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक करू नये, या मागणीसाठी कामबंद आंदोलन पुकारले होते. दोन दिवसांपूर्वी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
निलेश वाघमारे यांची अटक ही शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणात मोठी कारवाई मानली जात आहे. या प्रकरणातील कोणत्याही आरोपीची सुटका होणार नाही, असा स्पष्ट संदेश यामुळे गेला आहे. एसआयटीमार्फत संपूर्ण राज्यातील शिक्षण विभागाच्या व्यवहारांची चौकशी सुरू असून, यामधून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

