(मुंबई)
आजच्या डिजिटल आणि आर्थिक व्यवहारांच्या काळात पॅन कार्डचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. बँक खाते उघडणे, शेअर बाजारातील गुंतवणूक, म्युच्युअल फंड, आयकर विवरणपत्र, केवायसी अशा प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड आवश्यक असते. त्याचप्रमाणे आधार कार्ड हे सरकारी तसेच वैयक्तिक कामांसाठी अनिवार्य बनले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पॅन आणि आधार लिंक करणे बंधनकारक केले आहे.
31 डिसेंबर 2025 नंतर पॅन निष्क्रिय होणार
ज्या नागरिकांचे पॅन अद्याप आधारशी लिंक झालेले नाही, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की 31 डिसेंबर 2025 ही पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम तारीख आहे. या मुदतीपर्यंत लिंक न केल्यास 1 जानेवारी 2026 पासून संबंधित पॅन कार्ड निष्क्रिय होईल. त्यामुळे आर्थिक व्यवहार, बँकिंग सेवा आणि कर संबंधित कामे अडचणीत येऊ शकतात.
कोणासाठी पॅन-आधार लिंक बंधनकारक?
इन्कम टॅक्स विभागाच्या माहितीनुसार, 1 जुलै 2017 रोजी किंवा त्यापूर्वी जारी करण्यात आलेल्या पॅन कार्डसाठी आधार लिंक करणे आवश्यक आहे. ही सुविधा सर्व वैयक्तिक करदात्यांसाठी उपलब्ध असून, ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणी नसली तरीही लिंक प्रक्रिया करता येते. नवीन पॅन कार्डसाठी आधार आधारित पडताळणी आधीच लागू आहे.
पॅन-आधार कसे लिंक करावे? जाणून घ्या सोपी पद्धत
- पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी नागरिकांनी इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलला भेट द्यावी.
- लॉग इन केल्यानंतर प्रोफाइल सेक्शनमध्ये ‘Link Aadhaar’ हा पर्याय निवडावा.
- त्यानंतर पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक टाकून पुढे जावे.
- ई-पे टॅक्सद्वारे निर्धारित शुल्क भरल्यानंतर पॅन-आधार लिंक प्रक्रिया पूर्ण करता येते.
पॅन-आधार लिंक स्टेटस कसे तपासायचे?
तुमचा पॅन आधारशी लिंक आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी इन्कम टॅक्स वेबसाइटवरील ‘Link Aadhaar Status’ या पर्यायावर जावे. पॅन आणि आधार क्रमांक टाकून सबमिट केल्यावर स्क्रीनवर स्टेटस दिसेल. येथे ‘Linked’, ‘Not Linked’ किंवा ‘Linking in Progress’ असा संदेश पाहायला मिळतो.
तपशील जुळत नसल्यास काय करावे?
नाव, जन्मतारीख किंवा लिंगामध्ये फरक असल्यास पॅन-आधार लिंक करताना अडचण येऊ शकते. अशा वेळी यूआयडीएआयच्या वेबसाइटवरून आधार तपशील दुरुस्त करता येतात. पॅन कार्डमधील माहिती दुरुस्त करण्यासाठी प्रोटीन किंवा यूटीआयआयटीएसएल वेबसाइटचा वापर करता येतो. तरीही समस्या कायम असल्यास जवळच्या पॅन सेवा केंद्रात बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करून प्रक्रिया पूर्ण करता येते.
वेळेत आपले पॅन-आधार लिंक करून घ्या, अन्यथा भविष्यातील आर्थिक व्यवहार थांबण्याचा धोका आहे.

