(नवी दिल्ली)
“निवृत्तीबाबत मी कधीच काही बोललो नाही,” असे स्पष्टीकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिले. काही दिवसांपूर्वी त्यांनी “वयाच्या पंचाहत्तरी”विषयी केलेल्या भाष्यामुळे चर्चेला उधाण आले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.
नागपूरमध्ये अलीकडेच झालेल्या एका कार्यक्रमात भागवत यांनी संघाचे दिवंगत ज्येष्ठ नेते मोरोपंत पिंगळे यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला होता. “पंचाहत्तरीची शाल अंगावर पडली की जबाबदारीतून मुक्त व्हावे,” असे विनोदी शैलीतील त्यांचे म्हणणे भागवत यांनी उद्धृत केले. मात्र, या वक्तव्याच्या टायमिंगमुळे अनेक राजकीय आणि सामाजिक वर्तुळांत वेगवेगळ्या तर्क-वितर्कांना सुरुवात झाली. विशेष म्हणजे, येत्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भागवत दोघेही वयाची पंचाहत्तरी पूर्ण करत आहेत. त्यामुळे भागवत यांच्या वक्तव्याचा संदर्भ मोदींवरही लागू होतो, असा दावा काँग्रेसने केला होता.
या चर्चांवर पूर्णविराम देत भागवत यांनी गुरुवारी स्पष्टीकरण दिले. “पिंगळे यांचे बोलणे नेहमीच विनोदी आणि हलक्याफुलक्या स्वरूपाचे असायचे. मी केवळ त्यांच्या म्हणण्याचा संदर्भ दिला होता. मी स्वतःच्या किंवा कुणाच्या निवृत्तीबाबत कधीच बोललो नाही. आम्ही संघाच्या आदेशानुसारच कार्य करतो. संघ सांगेल तेव्हा जबाबदारी स्वीकारतो आणि तसेच सोडतो. संघामध्ये निवृत्ती वैयक्तिक इच्छा नव्हे, तर संघाची गरज असते,” असे भागवत यांनी स्पष्ट केले. मोहन भागवत यांनी दिलेल्या या खुल्या आणि स्पष्ट स्पष्टीकरणामुळे त्यांच्या निवृत्तीविषयी उठलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

