( मुंबई )
महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) अपर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांची नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते लवकरच नागपूर पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. या बदल्यांमुळे विद्यमान नागपूर पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नांगरे पाटील आणि सिंघल यांनी परस्परांच्या पदांची जबाबदारी स्वीकारणार आहेत.
राज्य सरकारने या फेरबदलात एकूण 14 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
14 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाला कुठे जबाबदारी?
- विश्वास नांगरे पाटील : अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) ➝ पोलीस आयुक्त, नागपूर शहर
- रविंद्र सिंघल : पोलीस आयुक्त, नागपूर शहर ➝ अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB)
- प्रशांत मोहिते : पोलीस उप आयुक्त, छत्रपती संभाजीनगर शहर ➝ पोलीस उप आयुक्त, डायल 112, नवी मुंबई
- निलेश रोहेन : पोलीस अधीक्षक, हिंगोली ➝ पोलीस अधीक्षक, नांदेड
- अभिनाज कुमार : पोलीस अधीक्षक, नांदेड ➝ पोलीस उप आयुक्त, पुणे शहर
- श्रीमंत लाड : अपर पोलीस अधीक्षक, खामगाव (बुलढाणा) ➝ पोलीस अधीक्षक, हिंगोली
- रुपाली अंबुरे : पोलीस उप आयुक्त, डायल 112, नवी मुंबई ➝ पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ
- शशिकांत सातव : पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर ➝ पोलीस उप आयुक्त, छत्रपती संभाजीनगर शहर
- रमेश धुमाळ : पोलीस उप आयुक्त, अमरावती शहर ➝ पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर
- पीयूष जगताप : समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 17, चंद्रपूर ➝ अपर पोलीस अधीक्षक, खामगाव (बुलढाणा)
- दत्तात्रय शिंदे : अपर पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर, वसई-विरार ➝ पदोन्नतीसह पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अभिलेख विभाग (CID), पुणे
- संजय शिंदे : पोलीस उपमहानिरीक्षक, सायबर, मुंबई ➝ अपर पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर, वसई-विरार
- संजय वर्मा : पोलीस महासंचालक, न्यायिक व तांत्रिक ➝ पोलीस महासंचालक, पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ
- अर्चना त्यागी : पोलीस महासंचालक, पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ ➝ पोलीस महासंचालक, न्यायिक व तांत्रिक
- नारायण शिरगांवकर : समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13, गडचिरोली ➝ समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 19, कुरळगाव (अहिल्यानगर)
- प्रांजली सोनावणे : पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (CID), अमरावती ➝ पोलीस उप आयुक्त, अमरावती शहर
प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न
या बदल्यांमागे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे हाताळणे, तसेच विविध पोलीस विभागांतील प्रशासकीय कामकाजाला गती देणे हा उद्देश असल्याचे मानले जात आहे. विशेषतः विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहराच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती ही राज्यातील सर्वाधिक चर्चेची बदली ठरली आहे.

