( पालघर )
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सोमवारी सकाळी भीषण अपघात होऊन १३ जणांचा मृत्यू झाला, तर २५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. लग्न समारंभासाठी निघालेल्या वऱ्हाडी मंडळींच्या आयशर ट्रकची कंटेनरला जोरदार धडक बसल्याने हा भीषण अपघात घडला. या घटनेमुळे लग्नाचा आनंद क्षणात शोकांतिका ठरला असून लग्न घरावर शोककळा पसरली आहे. या अपघातामध्ये मृत्यू आणि जखमी झालेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.
ही दुर्घटना पालघर जिल्ह्यातील धानीवरी गावाजवळ मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे १०० जण लग्नासाठी एका आयशर ट्रकमधून प्रवास करत होते. त्यावेळी समोरील कंटेनरला ट्रकची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की ट्रकचा ताबा सुटून वाहन रस्त्यावर पलटी झाले.
बालाराम दांडेकर नावाच्या तरुणाचा साखरपुडा होता. साखरपुड्यासाठी वऱ्हाडी ट्रकमधून जात होते. डहाणू तालुक्यातील बापूगाव येथून हे वऱ्हाड धानीवरी येथे जात असताना नवरीच्या घराजवळच हा अपघात झाला. धानिवरी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पोहोचले असता त्याचवेळी समोरून एक भरधाव कंटेनर आला. अचानक कंटेनरचा मागील डबा निसटून ट्रकवर येऊन आदळला. कंटेनरचा डबा धडकल्यामुळे वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक दूर फेकला गेला. मात्र अतिवेग, चालकाचे दुर्लक्ष की अन्य काही तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला का, याचा तपास पोलीस करत आहेत.
घटनास्थळी आरडाओरडा, ग्रामस्थांनी धाव घेतली
अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ आणि आरडाओरडा सुरू झाला. अनेक प्रवासी ट्रकखाली आणि वाहनाच्या आत अडकून पडले होते. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि प्रशासनाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात तसेच धुंदलवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी
प्राथमिक तपासात वऱ्हाडी मंडळींनी भरलेल्या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे मालवाहू वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक करण्याच्या गंभीर समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
प्रत्यक्षदर्भांनी दिलेल्या माहितीनुसार, धडक एवढी तीव्र होती की कंटेनरचा पुढचा केबिनचा भाग मुख्य बॉडीपासून वेगळा झाला आणि तो थेट वऱ्हाडाच्या आयशर ट्रकवर जाऊन कोसळला. यामुळे ट्रकमध्ये बसलेले अनेक लोक कंटेनरच्याखाली गेले. त्यातच एक दुचाकीही या वाहनांच्या कचाट्यात आली अन् त्यावरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात आणखी एकाचा मृत्यू होऊन मृतांचा आकडा 13 वर पोहोचला आहे. 4 जखमींना तातडीच्या उपचारांसाठी डहाणू येथील वेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.इतर जखमी प्रवाशांना पुढील उपचारांसाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तपासातील पुढील माहिती तसेच जखमींच्या प्रकृतीबाबतची अद्ययावत माहिती वेळोवेळी देण्यात येईल. अधिक माहितीसाठी अथवा संबंधित माहिती देण्यासाठी नातेवाईकांनी डॉ. सचिन वाघमारे यांच्याशी 94214 85504 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे पालघर जिल्हा प्रशासनानं आवाहन केलं आहे.
मृत व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
1. सुरेश रत्ना लाखात
2. पांडू गणपत लाखात
3. काळू गोविंद लाखात
4. सुनील अर्जुन दांडेकर
6. नमिता विठ्ठल दांडेकर
7. सारिका संतोष लाखात
8. आयुष सिताराम लाखात
9. सागर नामदेव शेंडे
10. वंदना शिवराम वळवी
11. सलोनी शिवराम वळवी
12. अजय अहाडी
13. रियांशी संतोष लाखात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
या भीषण अपघाताबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, “पालघरच्या धानीवरी येथे झालेल्या अपघातात १३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींवर तातडीने उपचार सुरू असून प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे.”
मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.

