( शिर्डी )
उद्योगपती अनंत अंबानी यांनी सोमवारी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी साईबाबांच्या संध्याकाळच्या धूप आरतीला उपस्थिती लावली. दर्शनानंतर अनंत अंबानी यांनी साईबाबा संस्थानला तब्बल 5 कोटी रुपयांची देणगी अर्पण केली.
साईबाबांच्या दर्शनानंतर अनंत अंबानी यांनी समाधीवर निळ्या रंगाची शाल अर्पण केली. त्यानंतर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साई शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अंबानी कुटुंबीय साईबाबांचे परमभक्त म्हणून ओळखले जातात. मुकेश अंबानी, नीता अंबानी तसेच आकाश अंबानी हे दरवर्षी दोन ते तीन वेळा शिर्डीत येऊन साईबाबांचं दर्शन घेतात. यापूर्वी 25 ऑक्टोबर 2022 रोजी अनंत अंबानी यांनी शिर्डीत येऊन दीड कोटी रुपयांची देणगी साईबाबांच्या चरणी अर्पण केली होती.
दरम्यान, नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. राज्यासह देश-विदेशातून साईभक्त शिर्डीत दाखल झाले असून, साई संस्थान प्रशासनाने भाविकांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. मंदिर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

