(नवी दिल्ली)
परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट (सुधारणा) नियम, 2026 अंतर्गत पासपोर्ट आणि संबंधित सेवांच्या शुल्कात मोठी वाढ जाहीर केली आहे. नवीन शुल्क 1 जुलैपासून लागू होणार असून, नवीन पासपोर्ट, पासपोर्टचे नूतनीकरण, हरवलेला किंवा खराब झालेला पासपोर्ट तसेच पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र (PCC) यासाठी आता अधिक शुल्क भरावे लागणार आहे.
विशेष म्हणजे, पासपोर्ट शुल्कात तब्बल 14 वर्षांनंतर वाढ करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट नियम, 1980 मधील जुन्या शुल्क सूचीच्या जागी नवीन शुल्क संरचना लागू करण्याची घोषणा केली आहे.
1 जुलैपासून लागू होणारे नवीन पासपोर्ट शुल्क
36 पानांचा पासपोर्ट (नवीन/नूतनीकरण)
- सामान्य सेवा : ₹1,500 वरून ₹2,500
- तत्काळ सेवा : ₹3,500 वरून ₹5,000
60 पानांचा पासपोर्ट (नवीन/नूतनीकरण)
- सामान्य सेवा : ₹2,000 वरून ₹3,500
- तत्काळ सेवा : ₹4,000 वरून ₹6,000
36 पानांचा हरवलेला किंवा खराब झालेला पासपोर्ट
- सामान्य सेवा : ₹1,500 वरून ₹5,000
- तत्काळ सेवा : ₹3,500 वरून ₹7,500
60 पानांचा हरवलेला किंवा खराब झालेला पासपोर्ट
- सामान्य सेवा : ₹2,000 वरून ₹6,000
- तत्काळ सेवा : ₹4,000 वरून ₹8,500
18 वर्षांखालील मुलांसाठी 36 पानांचा पासपोर्ट
- सामान्य सेवा : ₹1,000 वरून ₹1,750
- तत्काळ सेवा : ₹3,000 वरून ₹4,250
अल्पवयीन मुलांचा हरवलेला किंवा खराब झालेला पासपोर्ट
- सामान्य सेवा : ₹1,000 वरून ₹4,250
- तत्काळ सेवा : ₹3,000 वरून ₹6,750
PCC आणि इतर सेवांचे शुल्कही वाढले
पासपोर्टसोबतच पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र (PCC), सरेंडर सर्टिफिकेट आणि ग्लोबल एंट्री प्रोग्राम यांसारख्या सेवांचे शुल्कही वाढवण्यात आले आहे.
- पूर्वीचे शुल्क : ₹500
- नवीन शुल्क : ₹750
हे नवे दरही 1 जुलैपासून लागू होतील.
कोणाला मिळणार 10 टक्के सवलत?
नवीन नियमांनुसार, 8 वर्षांपर्यंतची मुले आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पहिल्यांदा पासपोर्ट काढताना 10 टक्के शुल्क सवलत दिली जाणार आहे. मात्र, ही सवलत फक्त प्रथमच पासपोर्ट घेणाऱ्यांसाठी लागू असेल. पासपोर्टचे नूतनीकरण किंवा पुनर्प्राप्ती करताना ही सवलत मिळणार नाही.
पासपोर्टची वैधता किती?
- अल्पवयीन मुलांचा पासपोर्ट : 5 वर्षे किंवा 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत (जे आधी असेल ते).
- प्रौढ व्यक्तींचा पासपोर्ट : 10 वर्षे वैध राहील.

