(अमरेली / गुजरात)
गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील खांभा तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. चातुरी गावाजवळ आजोबांसोबत चालत असलेल्या अवघ्या पाच वर्षांच्या मुलावर सिंहिणीने अचानक हल्ला करून त्याला जंगलाच्या दिशेने ओढून नेले. या घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या शोधानंतर घटनास्थळापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर मुलाचा मृतदेह आढळून आला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले.
वनविभागाने सिंहिणीला जेरबंद केले
घटनेनंतर वनविभागाने परिसरात व्यापक शोधमोहीम राबवत संशयित सिंहिणीला भूल देऊन पकडले आणि पिंजऱ्यात बंदिस्त केले. मात्र, परिसरात आणखी एक वन्यप्राणी असल्याची शक्यता असल्याने त्याचा शोध अद्याप सुरू आहे. सहाय्यक वनसंरक्षक (ACF) कपिल कुमार भाटिया यांनी सांगितले की, घटनास्थळाजवळ दोन वन्यप्राणी दिसून आले होते. त्यापैकी एका सिंहिणीला पकडण्यात यश आले असून दुसऱ्या प्राण्याचा शोध सुरू आहे.
गिर परिसरात वाढतोय मानव-सिंह संघर्ष
गिर वनक्षेत्रातील सिंहांची वाढती संख्या आणि जंगलाबाहेर वाढलेली मानवी वस्ती यामुळे सिंह मानवी वस्त्यांकडे येण्याच्या घटना वाढत आहेत. परिणामी, मानव आणि सिंह यांच्यातील संघर्षाचे प्रमाणही वाढत असून वनविभागासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांत अमरेली जिल्ह्यासह जाफराबाद, कोवाया आणि बागसरा परिसरात सिंहांच्या हल्ल्यात मानवी जीवितहानी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. फक्त गेल्या महिन्यातच अशा चार गंभीर घटना नोंदविण्यात आल्या आहेत.
ग्रामस्थांची कडक सुरक्षा उपाययोजनांची मागणी
चातुरी गावातील या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने सिंहांच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण ठेवावे, नियमित गस्त वाढवावी आणि गावांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

