(रत्नागिरी)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री. रुपेश जाधव यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत ‘माहेर’ या संस्थेत उपक्रम राबवला. १९ एप्रिल रोजी साजऱ्या झालेल्या वाढदिवसानिमित्त संस्थेतील गरजूंसाठी विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
गेल्या २९ वर्षांपासून उपेक्षित घटकांना आधार देणाऱ्या ‘माहेर’ संस्थेला यावेळी सीलिंग फॅन संच, वॉटर गिझर यांसारख्या इलेक्ट्रिकल वस्तूंसह अन्नधान्य किट देण्यात आले. राजकारणात कार्य करताना राजसाहेबांच्या सामाजिक बांधिलकीच्या विचारांमधून प्रेरणा घेत हा उपक्रम राबवण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले.
या प्रसंगी संस्थेचे कार्यवाह श्री. सुनील कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित राहून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. ‘माहेर’ परिवाराने अभिष्टचिंतन करून कार्यक्रमात आनंदाचे वातावरण निर्माण केले.
कार्यक्रमाला श्री. पप्पू शितप यांच्यासह श्री. राजू पाचकुडे, रोहन शेलार, सर्वेश जाधव, मार्विक नारकर, विशाल नाणीजकर, आदित्य चव्हाण आदी मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

