( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
शहराजवळील मिरजोळे नाखरेकरवाडी येथील भक्ती मयेकर खून प्रकरणाचा तपास सुरु असतानाच या हत्याकांडामागील दोन्ही संशयित आरोपींनी आणखी दोन खून केल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. पोलिसांनी रविवारी (१४ सप्टेंबर) आरोपींना एका गुन्ह्यातून दुसऱ्या खुनाच्या गुन्ह्यात वर्ग करून पुन्हा अटक केली. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दुर्वास दर्शन पाटील (२५, रा. जंगमवाडी, वाटद खंडाळा) आणि विश्वास विजय पवार (४१, रा. कळझोंडी, रत्नागिरी) अशी या आरोपींची नावे आहेत.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या दोघांनी केवळ भक्ती मयेकर हिचाच नव्हे, तर आणखी दोन व्यक्तींचा खून केल्याची त्यांनी कबुली दिली. २१ एप्रिल २०२४ रोजी कळझोंडी येथील रहिवासी सिताराम लक्ष्मण वीर (५५) यांना आरोपींनी बारमध्ये निर्दय मारहाण केली होती. त्यानंतर त्यांना ‘चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याचे’ भासवत त्यांना रिक्षामधून घरी पाठविण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांना तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. सिताराम वीर यांच्या खुनामागचे कारण उघड झाले ते अधिक चक्रावून टाकणारे होते. भक्ती मयेकरसोबत फोनवर संवाद केल्याचा संशय प्रियकर आरोपी दुर्वास पाटील याला आल्याने साथीदार विश्वास पवार याच्या मदतीने वीर यांचा ‘काटा’ काढण्याचे ठरविले. या संपूर्ण घटनेची माहिती आरोपींच्याच साथीदार राकेश जंगम याला होती. त्यामुळे त्याच्याकडून सत्य बाहेर येण्याची भीती निर्माण झाल्याने आरोपींनी राकेशचाही बळी घेतला. राकेशला कोल्हापूरला नेण्याच्या बहाण्याने त्याला गाडीत बसवून गळा आवळून खून करण्यात आला आणि मृतदेह आंबाघाटात फेकण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
एक खून पचवल्यानंतर आरोपींनी वर्षभरात आणखी दुसरा हत्याकांड घडवून आणला. त्यानंतर पुन्हा भक्ती मयेकरचा खून केला. भक्ती प्रकरणाचा तपास सुरु असतानाच मुख्य आरोपी दुर्वासने तोंडी कबुली देत इतर दोन खुनांची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर आता या तिहेरी खूनप्रकरणाचा तपास वेगाने पुढे सरकत असून, पोलिसांच्या पुढील चौकशीत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तिहेरी खून प्रकरणातील आरोपी आज पुन्हा न्यायालयासमोर
तिहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्वास पाटील आणि विश्वास पवार यांची सीताराम वीर यांच्या खुनाच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आल्याने त्यांची पोलिस कोठडी आज (१७ सप्टेंबर) रोजी संपत असून, आज त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या प्रकरणात आणखी नवे धागेदोरे समोर येतात का? हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

