(सिंधुदुर्ग / कुडाळ)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील हॉटेलमध्ये पैशांच्या वादातून झालेल्या तरुणाच्या हत्येचा पाच वर्षांनंतर मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. आरोपींनी खून केल्यानंतर मृतदेह आणि दुचाकी फोंडाघाटातील खोल दरीत फेकून हे प्रकरण रस्ता अपघात असल्याचा बनाव रचल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मुंबई क्राइम ब्रांच युनिट-7 ने या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
काय घडले होते 2021 मध्ये?
डिसेंबर 2021 मध्ये माळशिरस (सोलापूर) येथील अशपाक मुलाणी उर्फ निहाल याचा मृतदेह फोंडाघाट परिसरातील दरीत दुचाकीसह आढळला होता. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, मुंबई क्राइम ब्रांचला मिळालेल्या गुप्त माहितीमुळे या प्रकरणाचा पुन्हा तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक तपास आणि पुराव्यांच्या आधारे ही हत्या असल्याचे उघड झाले.
तब्बल पाच वर्षांनंतर या घटनेला वेगळेच वळण मिळाले. अशपाकच्या हत्येतील एका संशयिताने दारूच्या नशेत या खूनाबाबत उघडपणे एका सार्वजनिक ठिकाणी बोलणे केले आणि ही माहिती घाटकोपर क्राइम ब्रांचपर्यंत पोहोचली. त्यानंतर घाटकोपर क्राइम ब्रांचच्या पथकाने बुधवारी सकाळी चारही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. कठोर चौकशीदरम्यान संशयितांनी अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
हॉटेलमध्ये बोलावून हल्ला
तपासानुसार, अशपाक आणि आरोपी हे व्यवसायिक भागीदार होते. पैशांच्या व्यवहारावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. डिसेंबर 2021 मध्ये अशपाकला कुडाळ येथील एका हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. तेथे पैशांवरून वाद चिघळला आणि आरोपींनी त्याच्यावर हल्ला करून त्याची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह आणि दुचाकी फोंडाघाटातील खोल दरीत फेकून देण्यात आली. उशिरा रात्री सर्वांनी मिळून त्याची हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तसेच त्याची मोटारसायकल फोंडा घाटातील खोल दरीत फेकून दिली.
अपघाताचा बनाव आणि तपासाचा उलगडा
प्रारंभी हा मृत्यू अपघात असल्याचे मानून नोंद करण्यात आली होती. मात्र, काही वर्षांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पुन्हा तपास सुरू झाला. तपासात हा संपूर्ण घटनाक्रम नियोजित हत्या असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी अपघाताचा बनाव रचून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले.
अटक आणि पुढील कारवाई
मुंबई क्राइम ब्रांचने ठाणे आणि नवी मुंबई परिसरातून चार आरोपींना अटक केली आहे. त्यांची नावे सुरेश चंद्रहास सोनावडेकर, मनोज नारायण भंडगे, अतिश भगवान मोरे आणि ऋतुराज शेट्टी अशी आहेत. सर्व आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

