(मुंबई)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी कन्या रेवती सुळेच्या विवाहानिमित्त केलेली भावनिक सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. तब्बल 35 वर्षांपूर्वी स्वतःच्या लग्नात नेसलेली पैठणी मुलीच्या लग्नात पुन्हा परिधान करण्याचा योग आल्याची भावना त्यांनी या पोस्टमधून व्यक्त केली आहे.
सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाह 20 जून रोजी नागपूरचे उद्योजक सारंग लखानी यांच्यासोबत मुंबईत पार पडला. या खास प्रसंगी सुप्रिया सुळे यांनी 4 मार्च 1991 रोजी त्यांच्या स्वतःच्या विवाहात नेसलेली पैठणी पुन्हा परिधान केली.
‘या पैठणीत आठवणी आणि संस्कृती विणलेली आहे’
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे यांनी लिहिले की,
“मुलांचं लग्न हा प्रत्येक आई-वडिलांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. सुमारे ३५ वर्षांपूर्वी, ४ मार्च १९९१ रोजी ‘वधू’ म्हणून माझ्या लग्नात नेसलेली पैठणी ‘नवरीची आई’ म्हणून रेवती आणि सारंग यांच्या २० जून रोजी झालेल्या विवाहसोहळ्यात पुन्हा परिधान करण्याचा योग आला.
ही पैठणी छत्रपती संभाजीनगर येथील विणकर बशीरजी यांनी अत्यंत कौशल्याने विणलेली आहे. ती पुन्हा नेसताना अनेक आठवणी जाग्या झाल्या आणि आनंदात आणखी भर पडली.
काही गोष्टींचं सौंदर्य काळानुसार अधिकच खुलत जातं. या पैठणीत केवळ रेशमाचे धागे नाहीत, तर आठवणी, संस्कृती आणि आपल्या कारागिरांच्या कष्टांची समृद्ध परंपरा विणलेली आहे. म्हणूनच ही साडी नेसताना मी कारागिरांच्या अविश्रांत मेहनतीप्रती कृतज्ञ आहे. काही गोष्टींचं मोल कशातही चुकविता येत नाही, हेच खरं
आमच्या आयुष्यातील हे क्षण अधिक सुंदर करणाऱ्या सर्व प्रतिभावान विणकरांचा अतिशय अभिमान आहे. 
“
सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये या पैठणीत केवळ रेशीमाचे धागे नसून आठवणी, संस्कृती आणि कारागिरांच्या मेहनतीची समृद्ध परंपरा विणलेली असल्याचे नमूद करत सर्व विणकरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला विवाहसोहळा
रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाहसोहळ्याला देशातील राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. या विवाहाला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, डी. के. शिवकुमार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यासह विविध राज्यांतील मुख्यमंत्री उपस्थित होते. उद्योग क्षेत्रातून गौतम अदानी, मुकेश अंबानी यांच्यासह अनेक दिग्गजांनीही नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
सुप्रिया सुळे यांच्या या भावनिक पोस्टला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असून, परंपरा, संस्कृती आणि आठवणी जपणाऱ्या त्यांच्या या कृतीचे अनेकांनी कौतुक केले आहे.

