(रत्नागिरी /प्रतिनिधी)
विवाहाचे आमिष दाखवून लैंगिक व आर्थिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हातखंबा येथील व्यावसायिक अमित मधुसूदन देसाई याला रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयाने अटींसह नियमित जामीन मंजूर केला आहे. सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी हा आदेश देताना आरोपीस आरोपपत्र दाखल होईपर्यंत हातखंबा गावाच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई केली आहे.
रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ६९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी महिलेने विवाहाचे आश्वासन देत दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवून आर्थिक शोषण केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात आरोपी अमित देसाई याला १६ मे रोजी अटक करण्यात आली होती. जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही प्रौढ व विवाहित असून कथित संबंध तब्बल दहा वर्षांहून अधिक काळ परस्पर संमतीने सुरू होते, असा युक्तिवाद केला. तसेच फिर्यादी महिलेने यापूर्वी कोणतीही तक्रार दाखल केलेली नसल्याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.
दुसरीकडे, सरकारी पक्ष आणि फिर्यादी महिलेच्या वतीने आरोपी अमित देसाई याने विवाहाचे आश्वासन देऊन महिलेचा विश्वास संपादन केला, तिच्याकडून घटस्फोटाची प्रक्रिया सुरू करून घेतली; मात्र स्वतः वैवाहिक बंधनातून मुक्त होण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत, असा दावा करण्यात आला. तपास अद्याप सुरू असल्याने जामीन मंजूर करू नये, अशी मागणीही करण्यात आली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निरीक्षण नोंदविताना एफआयआरमध्ये विवाहाचे आश्वासन मोडल्याचा स्पष्ट उल्लेख नसल्याचे नमूद केले. तसेच आरोपी दीर्घकाळापासून न्यायालयीन कोठडीत असून यापुढे कोठडीतील चौकशीची आवश्यकता नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. खटल्याचा अंतिम निकाल लागण्यापूर्वी आरोपीला अनावश्यकपणे कारागृहात ठेवणे म्हणजे शिक्षेसमान ठरेल, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.
दरम्यान, साक्षीदारांवर दबाव येऊ नये किंवा पुराव्यांमध्ये हस्तक्षेप होऊ नये यासाठी न्यायालयाने कठोर अटी घातल्या आहेत. आरोपीने तपास अधिकाऱ्याला आपल्या निवासस्थानाची माहिती देणे, आठवड्यातून दोनदा पोलीस ठाण्यात हजेरी लावणे, साक्षीदारांशी कोणताही संपर्क न ठेवणे तसेच न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर न जाणे, अशा अटी जामिनासोबत घालण्यात आल्या आहेत. या आदेशामुळे जिल्ह्यात चर्चेत असलेल्या या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, आता तपास यंत्रणा आरोपपत्रात कोणते पुरावे सादर करते याकडे लक्ष लागले आहे.

