(रायगड / पेण)
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पाटनेश्वर आदिवासी वाडी येथे अवघ्या ५ वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत बालिकेचे नाव रिया सागर वाघमारे असे आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाटनेश्वर आदिवासी वाडी येथे राहणारी रिया अचानक बेपत्ता झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, रिया ही रात्री आई-वडिलांसोबत घरी झोपली होती. पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास तिचे वडील जागे झाल्यानंतर रिया बेपत्ता असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलगी दिसत नसल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी तिचा शोध सुरू केला, ती बराच वेळ न सापडल्याने त्यांनी तातडीने पेण पोलिसांना माहिती दिली.
मात्र, काही वेळातच तिचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. डॉग स्कॉडच्या मदतीने शोध घेत असताना सकाळी सुमारे आठच्या सुमारास घरापासून सुमारे 100 मीटर अंतरावरील शेतमळा परिसरात रियाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पेण पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वेगाने तपासाची चक्रे फिरवली.
संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणात पेण पोलिसांनी किरण भिकू वाघमारे (वय 24) या संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक संशयाच्या आधारे त्याच्याकडे चौकशी सुरू असून, घटनेमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. चिमुकलीचे अपहरण का करण्यात आले? हत्या करण्यामागे कोणता हेतू होता? आरोपीचा या घटनेशी नेमका काय संबंध आहे? यासह विविध बाबींचा तपास सुरू आहे.
आरोपीच्या पार्श्वभूमीचीही तपासणी
पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी करण्यात येत असून, जुन्या वादातून हा प्रकार घडला का किंवा यामागे अन्य कोणते कारण आहे का, याचा तपास केला जात आहे. तसेच आरोपीचा यापूर्वी कोणत्याही गुन्ह्यात सहभाग होता का, याचीही माहिती घेतली जात आहे.
दरम्यान, अवघ्या ५ वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूमुळे पाटनेश्वर आदिवासी वाडी तसेच पेण तालुक्यात शोककळा पसरली आहे. या अमानुष घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि तपास सुरू आहे.

