(रत्नागिरी / प्रतिनिधी)
उन्हाळी सुट्ट्या, पर्यटकांची वर्दळ आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात गेल्या आठवड्यापासून सीएनजीचा भयंकर तुटवडा जाणवत असून, वाहनचालक आणि विशेषतः रिक्षाचालक अक्षरशः हैराण झाले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर बनली असून, नागरिक आणि पर्यटकांना याचा मोठा फटका बसतो आहे.
शहरातील केवळ तीन सीएनजी पंपांवर होत असलेला अपुरा पुरवठा, कमी दाबाने होणारे वितरण आणि तासनतास लांबचलांब रांगा यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. अनेक वेळा गॅस कमी दाबाने मिळत असल्याने गाडी भरायला अधिक वेळ लागतो, परिणामी रिक्षाचालकांचे उत्पन्न घटते आणि खर्च वाढतो. दिवसभर रांगेत थांबावे लागल्याने प्रवासी सेवा देणे अशक्य बनले असून, याचा थेट परिणाम रिक्षाचालकांच्या उत्पन्नावर होत आहे. “गॅस नाही, धंदा नाही; मग बँकेचे हप्ते कसे भरायचे?” असा उद्विग्न सवाल रिक्षाचालक विचारत आहेत.
या परिस्थितीचा फटका पर्यटकांनाही बसतो आहे. दूरवरून आलेले पर्यटक सीएनजीसाठी वेळ वाया घालवत असल्यामुळे त्यांना शहरातील पर्यटनस्थळे पाहण्याची संधीही मिळत नाही. त्यामुळे नाराजीचा सूर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त रिक्षाचालक-मालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. “तातडीने सीएनजीचा पुरवठा सुरळीत न झाल्यास, मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी आणि तहसीलदारांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे आणि रत्नागिरीतील सीएनजीचा तुटवडा दूर करावा, अशी जोरदार मागणी रिक्षाचालक व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

