(रत्नागिरी /प्रतिनिधी)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याच्या तयारीत असतानाच रत्नागिरी तालुक्यात ठाकरे गटाला जोरदार राजकीय हादरा बसला आहे. तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि प्रतिष्ठेचा मानला जाणारा मिरजोळे जिल्हा परिषद गटातून तीन प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिरजोळे गटातील वैभव पाटील (विभागप्रमुख), डॉ. मयुरेश पाटील (उपविभागप्रमुख) आणि शुभानंद पाटील (विभाग संघटक) या सक्रिय व प्रभावी पदाधिकाऱ्यांनी सध्याच्या परिस्थितीत पक्षाचे काम करणे शक्य नसल्याचे कारण पुढे करत आपल्या पदांचा राजीनामा सादर केला आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर घडलेल्या या घडामोडीमुळे ठाकरे गटाची तालुकास्तरावरील बांधणी हादरल्याचे स्पष्ट चित्र आहे.
नगरपालिका, नगरपंचायत आणि विशेषतः आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असताना, मिरजोळेसारख्या महत्त्वाच्या गटातून हे तगडे शिलेदार बाहेर पडणे ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या तिन्ही पदाधिकाऱ्यांचा निर्णय केवळ वैयक्तिक कारणांपुरता मर्यादित नसून, ते आपल्या सोबत १० ते १५ निष्णात व सक्रिय कार्यकर्त्यांची मोठी फळी घेऊन लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटात अधिकृत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.
स्थानिक पातळीवर सक्षम उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच शिंदे गटाने ही राजकीय खेळी खेळत ठाकरे गटाला जोरदार शह दिल्याची चर्चा सध्या जिल्हाभर रंगली आहे. या संभाव्य बंडामुळे मिरजोळे गटातील जुनी राजकीय समीकरणे पूर्णतः विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली असून, ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या राजकीय भूकंपानंतर आगामी निकालांची दिशा कोणत्या बाजूने झुकणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

